मुंबई : जुलै महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. ज्यानंतर पावसाने ऑगस्ट महिन्यात दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला होता. अनेक जिल्ह्यात दुष्काळाचे आणि पाणी टंचाईचे संकट देखील निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात गोपाळकाल्याच्या दिवशी राज्यातील अने भागांत पावसाने हजेरी लावत सर्वांनाच सुखद धक्का दिला. त्यानंतर पुन्हा दोन दिवस गुडूप झालेल्या पावसाने आज (ता. 14 सप्टेंबर) पुन्हा हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. मुंबई आणि त्यासोबतच आसपासच्या शहरांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. ज्यानंतर मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. (Rain Update : Meteorological Department has predicted possibility of heavy rain in these districts)
हेही वाचा – सार्वजनिक गणेशोत्सवांसाठी आनंदाची बातमी; परवानगीसाठी दरवर्षी रांगेत लागण्याची गरज नाही, कारण…
सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्यानंतर राज्यातील पावसाच्या संदर्भात हवामान विभागाकडून महत्त्वाची बातमी देण्यात आली आहे. हवामान खात्याकडून पुढच्या काही तासांसाठी राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांना हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेचा पाऊस पडेल अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या काही तासांमध्ये पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशात सकाळपासूनच, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर या शहरांमध्ये काही काही तासांमध्ये मुसळधार होत आहे.
त्याचबरोबर पुढील काही तासांमध्ये तासांमध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, नांदेड, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही तास या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस येऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊन घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन हवामान खात्याकडून नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच, जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांनी हवामानानुसार शेतीच्या कामांना सुरुवात करावी, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.