मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वच भागात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत सापडलेला पाहायला मिळत आहे. कारण पावसाने जुलै महिन्यात लावलेले हजेरी आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी आता संकटात सापडलेली आहे. शेतकऱ्यांवर आता दुबार तर काही शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीचा संकट ओढावलेले आहे. असे असताना आता हवामान खात्याकडून एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा एकदा जोरदार आगमन करणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे हवामान खात्याने आता काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलेला आहे. (Rain Update: Meteorological department warns of heavy rain in districts state)
हेही वाचा – बनावट चावी बनवून घर साफ, घरात काम करणार्या महिलेचा प्रताप
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे आज (ता. 19 ऑगस्ट) सकाळपासूनच पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. सुरुवातीला हवामान विभागाकडून पूर्व विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आलेला होता, पण हवामानाची बदलली स्थिती पाहता आता अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आज पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.
पश्चिम महाराष्ट्रामधील पुण्यात देखील हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुढील तीन दिवस पुणे शहरासह इतर भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. गेल्या आठ दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता भुसावळमधील मुक्ताईनगरमध्ये परतलेला असून आज सकाळपासूनच मुक्ताईनगरमध्ये पावसाची रिमझिम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातही पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे.