पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे; हवामान खात्याकडून इशारा

मुंबई : मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे थैमान सुरू आहे. राज्यात, विशेषत: किनारपट्टी भागांत पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांसह अन्य अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

ओडिशाजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी छत्तीसगडवर स्थिरावले. त्यातच पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुंबई, रायगड, कोल्हापूरसह कोकणात पावसाने थैमान घातलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी नदी तसेच रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.. पावसाचा जोर लक्षात घेता एनडीआरएफच्या तुकड्या कोकणात सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसह चाकरमान्यांनी योग्य ती खरबदारी घेण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोकणात पाचही दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर 8 जुलैला नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – रुकने वाला वजह ढुंढता हैं, और…, बंडखोर आमदारांसाठी राऊतांचं ट्विट