घरमहाराष्ट्रपावसाचा पर्यटन व्यवसायाला फटका !

पावसाचा पर्यटन व्यवसायाला फटका !

Subscribe

यंदा दिवाळीच्या सुट्टीत सतत पडणार्‍या पावसाने पर्यटनावर अक्षरशः पाणी फेरले असून, वादळी हवामान, रस्त्यांची दुर्दशा, निवडणूक आणि आर्थिक मंदी यांनीही त्याला आपापल्यापरीने हातभार लावला आहे. परिणामी पर्यटकांच्या सुविधांसाठी व्यवसाय थाटलेल्यांच्या डोक्यावर आर्थिक संकट घोंगावू लागले आहे.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यांप्रमाणे अलिबाग तालुक्यातही पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने अनेक नव उद्योजकांनी हॉटेल, लॉजिंग, खानावळी, तसेच स्थानिक खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत. जुन्या व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. मात्र या एकूण व्यवसायात तब्बल ७५ टक्के इतकी लक्षणीय घट या सहामाहीत झाली आहे. दिवाळीतही पर्यटकांनी पाठ फिरविल्याने व्यवसायाची पाटी बरीचशी कोरी राहिली. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणार्‍या व्यावसायिकांचे ऐन दिवाळीत दिवाळे निघाले आहे.

- Advertisement -

कुलाबा किल्ला, किहिम, नागाव, आक्षी, आवास, मांडवा, रेवदंडा बीचसह काशीद-मुरुडकडे जाणार्‍या पर्यटकांचा राबता सुट्टीच्या काळात मोठ्या प्रमाणात असतो. गेल्या वर्षात पर्यटन व्यवसायाने चांगली भरारी घेतली होती. दरवर्षी या व्यवसायात वाढ होत आहे. दिवाळी, नाताळ, मे महिन्याच्या मोठ्या सुट्टीत तर पर्यटन व्यवसाय तेजीत असायचा. मात्र या वर्षी बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याने यावर्षी दिवाळीच्या सुट्टीत प्रचंड नुकसान झाल्याचे व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत राहण्यासाठी, नाश्ता-जेवणासाठी एक महिना आधीपासूनच नोंदणीला सुरूवात होत असे. यावर्षी दिवाळीची सुट्टी पर्यटकांची वाट पाहण्यातच संपली. यामुळे केलेली गुंतवणूक फुकट गेली आहे.
-सचिन राऊळ, व्यावसायिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -