गेल्या २४ तासांच पावसाची संततधार कायम असून मुंबईला ऑरेंज आणि पालघरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाच्या सततच्या जोरदार बॅटींगमुळे सखल भागांत पाणी साचले. गुडघाभर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्ते जलमय झाल्याने रस्ते वाहतूक कासवगतीने सुरू होती, तर रेल्वे वाहतुकीलाही पावसामुळे लेटमार्क लागला.
सततच्या तुफानी पावसामुळे मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर परिसराला झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. तर यंत्रणांची तारांबळ उडाली. मुंबई परिसरातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तर अनेक धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा जमा झाला आहे.
मुंबईलाही मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला. दादर, सायन, माटुंगा, परळ, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट परिसरात पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. तसेच, या मुसळधार पावसाचा फटका मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही बसला होता.
दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये ५६ टक्के पाणीसाठा झाला असून सात महिने पुरेल एवढा जलसंचय झाला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला असून, सावित्री, गांधारी, काळ, उल्हास, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
पालघर, नाशिक आणि पुणे या तीन जिल्ह्यांना गुरुवारी रेड अलर्ट देण्यात आला असून, येथे अतिवृष्टीची शक्यता आहे. तर मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
दक्षिण ओडिशा तटीय क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह पूर्व आणि पश्चिमेकडील प्रदेशातील हवामान बदलामुळे मुंबईसह राज्यभरात काही ठिकाणी अतिवृष्टी तर बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा – गुरुपौर्णिमा हा तर निष्ठेचा उत्सव; राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंना टोला