घरमहाराष्ट्रपावसाचा राज्यभर दमदार धडाका

पावसाचा राज्यभर दमदार धडाका

Subscribe

शेतकर्‍यांना आनंदाचे उधाण

अनेक दिवसंपासून प्रतिक्षेत असलेल्या पावसाने शुक्रवारी दमदार हजेरी लावली. शुक्रवारी मुंबईसह संपूर्ण राज्याला पावसाने ओलेचिंब केले. मात्र शुक्रवारच्या पावसाने शनिवारीही आपला धडाका कायम ठेवला. पावसाअभावी पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली होती. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहे.

नैऋत्य मोसमी वार्‍यांनी जोर धरताच राज्याच्या पश्चिम भागात मान्सून सक्रिय झाला. मुंबईत रात्रभर अधूनमधून मुसळधार पाऊस पडत होता. मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळत होता. दुष्काळग्रस्त भागात विदर्भ आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंती कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला. तर कोकणामधील जगबुडी नदीवरील पुलाचा जोडरस्ता खचला.

- Advertisement -

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात जगबुडी नदीवरील जुन्या पुलाशेजारी हा जोडरस्ता बांधण्यात आला होता. या जोडरस्त्याला मोठे भगदाड पडले असून पुलाच्या संरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. हा पूल यावर्षी वाहतुकीसाठी खुला होणार होता. पुणे व कोकणाप्रमाणे जालन्यालाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. जालन्यातील रायघोळ व जुई नदीला पूर आला. भोकरदन तालुक्यातील झालेल्या तुफान पावसामुळे आण्वा, पारध, जानेफळ भागात शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

पारध येथील जनता हायस्कूलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदीच्या उगमावरील आंबीत धरण वाहू लागल्याने जादा पाणी पिंपळगाव-खांड धरण्यात सोडण्यात आले. पिंपळगाव-खांड धरणही भरण्याच्या मार्गावर असून, पावसाचा जोर असाच कायम राहिला तर तालुक्यातील मुळा धरणही भरण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्येही चांगला पाऊस झाला. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने कोल्हापूरमधील पाण्याची समस्या दूर झाली आहे.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले. सलग दोन दिवस पडणार्‍या पावसामुळे पालघरमधील वीज पुरवठा तब्बल 16 तास खंडित झाला. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. तसेच पाणी तुबंल्याने विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्याचप्रमाणे भिवंडी, कल्याणे, डोेंबिवली, ठाणे व दिवा या परिसरात पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. कोकण, मुंबई, रायगड आणि पालघर, पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -