विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले

vidhan sabha
विधान भवन

राज्य विधीमंडळाचे १८ जुलैपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय विधिमंडळ सचिवालयाने जाहीर केला. या अधिवेशनाची पुढील तारीख संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी विधीमंडळाने दिली आहे.

राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन नुकतेच मुंबईत पार पडले. हे अधिवेशन संस्थगित होताना आगामी पावसाळी अधिवेशन येत्या १८ जुलैपासून सुरु होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असल्याने १८ जुलै ऐवजी १९ किंवा २० जुलैपासून हे अधिवेशन सुरु होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेतही विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी पत्रकार परिषदेत दिले होते. मात्र आता पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात विधीमंडळ सचिवालयातर्फे सर्व आमदारांना कळविण्यात आले आहे. मात्र नेमक्या कोणत्या तारखेला हे अधिवेशन सुरू होईल हे अदयाप स्पष्ट नाही त्यामुळे पावसाळी अधिवेशन केव्हा सुरु होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. त्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. साधारण १९ किंवा २० जुलैला मंत्रीमंडळ विस्तार होउ शकतो. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन बोलविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

पावसाळी अधिवेशना आधी मंत्रिमंडळ विस्तार –

पंतप्रधान नरेंद्र मोदी,  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसही होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लवकरच मंत्रिमंडळ विस्तारावर निर्णय घेतला जाईल. आषाढी एकादशी नंतर अधिवेशनही घ्यायचे आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.