ज्यांनी हल्ला केला आधी त्यांना कळेल, मग सगळ्यांना कळेल; संदीप देशपांडे हल्ल्यावर राज यांचा इशारा

संग्रहित छायाचित्र

ठाणेः संदीप देशपांडेवर ज्यांनी हल्ला केला त्यांना आधी कळेल, मग सगळ्यांना कळेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील जाहिर सभेत दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये राज ठाकरे यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या भाषणात राज यांनी सुरुवातीलाच संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर भाष्य केले. ते म्हणाले, संदीपवर हल्ला केल्यानंतर मला अनेकांनी विचारलं की तुम्हाला काय वाटतं हा हल्ला कोणी केला असेल. त्यावेळी मी काही बोललो नाही. पण हा हल्ला ज्यांनी केला, त्यांना आधी कळेल, मग सगळ्यांना कळेल. माझ्या मुलांच रक्त मी वाया जाऊ देणार नाही. महाराष्ट्रासाठी ते काम करायला आले आहेत. या फालतू लोकांसाठी नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. दादर येथील शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर हा हलला झाला. मॉर्निंग वॉक करत असतानाच काही अज्ञातांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. त्यांना स्टपने मारहाण केली. सुरुवातीला तेथे वॉक करणाऱ्यांचा समज झाला की क्रिकेट खेळणाऱ्या मुलांमध्ये काही भांडण झाले आहे. नंतर संदीप देशपांडे यांना मारहाण सुरु असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मारहाण करणारे तेथून पळून गेले. संदीप देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन संदीप देशपांडे यांना घरी सोडले.

राज ठाकरे यांच्या घरापासून काही अंतरावरच संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. हल्ल्याची माहिती मिळताच राज ठाकरे हे तत्काळ संदीप देशपांडे यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी माध्यमांना या हल्ल्याविषयी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र ठाणे येथील वर्धापन दिनाच्या भाषणात सुरुवातीलाच राज यांनी हा हल्ला करणाऱ्यांना धमकी वजा इशारा दिला.