घरमहाराष्ट्रजातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे

जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे

Subscribe

राष्ट्रवादीने जातीय राजकारण सुरू केले ,शरद पवार कधीही भाषणात शिवरायांचे नाव घेत नाहीत - राज ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित सिनेमांमध्ये दाखवण्यात येणार्‍या ऐतिहासिक संदर्भावरून राज्यात वाद पेटलेला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. आपल्याकडे इतिहासाकडे जातीच्या दृष्टिकोनातून बघण्याचे पेव फुटले आहे. काही मूठभर लोकच असे करतात. कारण त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ असतो, परंतु इतिहास जातीच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय तुम्ही इतिहास दाखवूच शकत नाही. फक्त इतिहासाला धक्का लागणार नाही हे बघणे गरजेचे आहे. परंतु हे वाद जाणूनबुजून निर्माण केले जात असून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू झाले. शरद पवार आपल्या जाहीर भाषणांत कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत, असा आरोप करत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. कोकण दौर्‍यावर असलेले राज ठाकरे यांनी गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांना हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमांवरून सुरू झालेल्या वादासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी आपली भूमिका मांडताना राज ठाकरे यांनी सांगितले की, वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाच्या कार्यक्रमात मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होतो. तेव्हा सिनेमाच्या दिग्दर्शकाने जी सहा नावे टाकली त्या नावांवर काही वाद झाल्याचे सांगितले. जेव्हा इतिहासाबद्दल संभ्रम होतो तेव्हा आपण त्यांच्याशी बोलले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. मीदेखील असेच करतो. मध्यंतरी मी इतिहास अभ्यासक गजानन मेहंदळे यांना भेटलो. त्यांना यासंदर्भात विचारले असता जगात कोणत्याही इतिहासाच्या पानात ते ७, ८ की १० होते हे नमूद करण्यात आलेले नाही. कोणत्याही पानात प्रतापराव गुजर यांच्यासोबत कोण गेले याबद्दलही स्पष्टता नाही. आतापर्यंत ऐकलेली नावे ही काल्पनिक नावे असल्याचे मेहंदळे यांनी सांगितले. कोल्हापूर दौर्‍यात इतिहास अभ्यासक जयसिंग पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी गजानन मेहंदळे यांच्या दाव्याला दुजोरा दिला, असेही राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

शरद पवारांनी टोळ्या निर्माण केल्या
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात असे जातीय वाद होत नव्हते किंवा फार कमी प्रमाणात होत होते. पण शरद पवारांनी काही टोळ्या निर्माण केल्या आहेत. त्यांचा वापर करून मराठा व इतर समाजात फूट पाडली जाते. नंतर दोन्ही समाज आपल्या खिशात घालायचे, असे पवार यांचे राजकारण आहे.

आपल्याकडील इतिहास ब्राम्हण, मराठ्यांनी लिहिलेला नाही
आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही. पोर्तुगीज, मोगल, ब्रिटिशांकडून या गोष्टी आल्या. महाराजांच्या काळात असलेल्या शिवभारत ग्रंथात ज्या गोष्टी सापडतात त्याच आपल्यासमोर आहेत. याव्यतिरिक्त आपल्याकडे काही दाखले, पत्रच नाहीत. त्यामुळे यातून काहीतरी शोधून लोकांपर्यंत इतिहास पोहचवावा लागतो. त्यामुळे प्रतापराव गुजरांबरोबर कोण ६ लोक होते याला काही अर्थच उरलेला नाही.

- Advertisement -

यालाच जातपात म्हणतात – जितेंद्र आव्हाड
हे जातीपातीचे राजकारण वगैरे काही नसते. हे फक्त बोलण्यापुरते असते. जेव्हा ते करतात तेव्हा ते बरोबर असते.
राष्ट्रवादीचा जन्म १९९९ साली झाला. जेम्स लेनने शिवाजी महाराजांच्या पितृत्वावर शंका निर्माण केली २००३ मध्ये, पण जेम्स लेनला ज्यांनी ही माहिती दिली होती ते लेले, मेहंदळे, भंडारी यांची जाऊन तुम्ही माफी मागितली. त्यांनी महाराजांची बदनामी करायची आणि तुम्ही त्यांची बाजू घ्यायची याला जातपात म्हणतात. तेव्हाही या लढाईत सगळ्यात आघाडीवर मी होतो. मी मराठा नाही, मागासवर्गीय आहे. मराठा हा शब्द महाराष्ट्राची ओळख आहे. तो आता जातीपातींमध्ये आला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

सत्ताधारी खासदार, आमदारांनी राजीनामे द्यावेत -नाना पटोले 

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, परंतु या दैवताचा भारतीय जनता पक्ष वारंवार अपमान करीत असून यातून भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. राज्यपाल कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यानंतर आता राज्यातील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही महाराजांबद्दल गरळ ओकली आहे. सत्तेत असलेल्या आमदार आणि खासदारांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जर थोडासाही स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी या अपमानाबद्दल तात्काळ राजीनामे द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केली.

गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या पाठोपाठ पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे भाजपला फक्त निवडणुकीत मते मिळवण्यासाठीच हवे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रातील महाराजांच्या स्मारकाचा मोठा गाजावाजा करीत इव्हेंट केला होता. निवडणुकीत छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन मतेही मागितली, पण सत्तेत येताच भाजपचा खरा चेहरा बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली, असे निर्लज्जपणे भाजपचा प्रवक्ता म्हणतो. राज्यपाल कोश्यारी यांनी तर महाराज जुने झाले, असे म्हणत गडकरींशी तुलना केली. हे कमी होते की काय म्हणून मंगल प्रभात लोढा यांनी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना राज्यातील एका पक्षातील बंडखोरांशी केली. भाजपची महाराजांबद्दलची भूमिका हीच आहे हे स्पष्ट झाले आहे. हे अत्यंत निर्लज्जपणाचे लक्षण असून आता माफी मागून सारवासारव केली जात आहे, पण अशा प्रवृत्तींना माफी नाहीच. याचे प्रायश्चित्त त्यांना भोगावेच लागेल, असा इशाराही पटोले यांनी दिला.

मुख्यमंत्री शिंदेंनी गनिमी कावा केला – संजय गायकवाड
शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनीदेखील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची तुलना शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाची जाणीव असली पाहिजे यात काहीही दुमत नाही, पण एकनाथ शिंदे हे बेईमान व्यक्ती नाहीत. शिवाजी महाराजांनीदेखील वेळप्रसंगी गनिमी कावा केला होता. तोच गनिमी कावा एकनाथ शिंदे यांनीदेखील वापरला आहे. याआधी ज्या नेत्यांनी शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली आहे. त्यामुळे हे लोक पुन्हा असे काही बोलतील असे वाटत नाही, असेही गायकवाड म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -