मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात वरळी येथील एनएससीआय डोममध्ये गुरुवारी (ता. 30 जानेवारी) मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केले. याचवेळी त्यांनी भाजपा नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबतचाही एक किस्सा सांगितला. ज्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. राज ठाकरे यांनी भेटायला येणाऱ्या भाजपाच्या नेत्यांवर भाष्य केले. तर एका भेटीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खांदा उंच करुन शक्ती दाखवल्यासारखी कृती केली होती. या कृतीबाबतही राज ठाकरेंनी मत व्यक्त केले. चंद्रकांत पाटील यांनी ती कृती का केली? मला माहीत नाही, असे यावेळी राज ठाकरेंकडून सांगण्यात आले. (Raj Thackeray comment on Chandrakant Patil actions after the meeting)
मनसे मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, राजकारणाचा सगळा चिखल झाला आहे, त्यात तुम्ही जागरुक राहिले पाहिजे. अनेक लोक मला सांगतात, भाजपाच्या नेत्यांना भेटायला नको. भेटायला नको? समोरचा माणूस म्हणाला चहा प्यायला घरी येतो तर त्याला काय सांगायचे? घरीच चहा पी. तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही काय सांगाल? मला जेव्हा कोणीही भेटायला येते तेव्हा मी तुम्हाला विकत नाही. मी मराठीचा बाणाही बोथट करत नाही. मध्यंतरी नाशिकला होतो, समोरुन चंद्रकांत पाटील आले. नमस्कार वगैरे करुन म्हणाले मुंबईत आलो की येतो चहा प्यायला. मला सांगा ही परिस्थिती तुमच्यावर आली. तर काय कराल? चहा कशाला प्यायचा? कशाला घरी येता? असं सांगू का? एक माणूस समोरुन सांगतोय की चहा प्यायला येतो तर येच म्हणणार, असे यावेळी राज ठाकरेंकडून सांगण्यात आले.
हेही वाचा… Raj Thackeray : भ्रष्टाचाऱ्यांशी हातमिळवणी करण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाजपावर साधला निशाणा
तर, चंद्रकांत पाटील नाशिकच्या भेटीनंतर मुंबईत मला भेटायला आले. बरं हे बाहेर जाऊन वेगळे बोलतात. बरेच दिवस आपण भेटलो नाही वगैरे एवढंच असते. मुंबईत चंद्रकांत पाटील आले, माझ्याशी चर्चा केली. चहा-पाणी झाल्यावर बाहेर पडले. पत्रकारांनी विचारले भेटीत काय झाले? तर काय सांगावे? सहज भेट होती, सदिच्छा भेट होती हे सांगावे ना. पण चंद्रकांत पाटील यांनी खांदा उंच करून शक्ती दाखवल्यासारखी कृती केली. ती त्यांनी का केली? मला अजूनही कळलेले नाही. या भेटीनंतर पत्रकार मला विचारत होते त्यांनी असे का केले? मी म्हटले म्हणजे काय? आम्ही दोघेही एकमेकांना तोच प्रश्न विचारत होतो, असे राज ठाकरेंनी म्हटले.
पण बाई आणि बुवा एकत्र भेटले की लफडंच असले पाहिजे असे पत्रकारांना वाटते, अशी खोचक टीका करत राज ठाकरे म्हणाले, नॉर्मलही भेटही होऊ शकतात ना. आधी राजकारणात सगळे एकमेकांना भेटत होते. पक्षाच्या धोरणांमध्ये तडजोड होत नव्हती. आत्ताही तसे नाही. चंद्रकांत पाटील यांनी ती कृती का केली? मला माहीत नाही. काय मला त्यांनी कडेवर घेतले होते की मी कोपरात अक्रोड ठेवून त्यांना फोडून दाखवला. काय मला काहीच कळले नाही, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. एक लक्षात ठेवा, कुणीही भेटायला आले तरीही पक्षाचे प्रेम आणि धोरण बाजूला ठेवणार नाही, असेही यावेळी राज ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आले नाही.