मुंबई : आज (ता. 14 सप्टेंबर) अखेरीस 17 दिवसांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात बसलेल्या मनोज जरांगे यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन जरांगे यांचे उपोषण सोडवले. जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर बऱ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत अनेक राजकारण्यांकडून मत व्यक्त करण्यात आले. विजय वडेट्टीवर, नारायण राणे या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांचे उपोषण सुटल्यानंतर त्याबाबतची सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. (Raj Thackeray criticized the state government as Manoj Jarange called off his fast)
हेही वाचा – ओबीसी समाजासाठी विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केले आवाहन, म्हणाले…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करत असतात. मनोज जरांगे यांनी त्यांचे बेमुदत उपोषण मागे घेतल्यानंतर याबाबतची पोस्ट करत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओबाबतचा किस्सा घडल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो.”
काय आहे राज ठाकरेंची सोशल मीडिया पोस्ट?
श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो.
आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे.
गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा.
सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो.
श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली…
— Raj Thackeray (@RajThackeray) September 14, 2023
17 दिवसांनंतर उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे मत व्यक्त करत म्हटले की, आपल्या या आंदोलनाला 29 ऑगस्टपासून सुरुवात झाली होती. तेव्हापासून हे आंदोलन सुरू आहे. राज्यातील ही पहिली घटना आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते पहिल्यांदा उपोषणस्थळी पोहचले आहेत. हे आपले यश आहे. तेव्हा तुमच्या टाळ्या वाया जाणार नाही. जीव गेला तरी आरक्षणासाठी लढा सुरूच ठेवणार आहे. तेव्हा मराठा समाजाला न्याय देऊ शकतील ते फक्त एकनाथ शिंदेच आहेत.