पनवेल : शनिवारी (ता. 12 ऑगस्ट) उद्योजक चोरडिया यांच्या पुण्यातील बंगल्यावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये भेट झाली. कौटुंबिक नात्यामुळे ही भेट झाली असल्याची माहिती अजित पवार आणि शरद पवार या दोघांकडूनही देण्यात येत आहे. परंतु, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आता काका-पुतण्यांच्या भेटीवर निशाणा साधला आहे. आज (ता. 16 ऑगस्ट) पनवेल येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे मनसे पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. (Raj Thackeray criticizes Deputy Chief Minister Ajit Pawar)
हेही वाचा – रस्त्यांच्या आंदोलनाला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आलोय; राज ठाकरेंनी घातला थेट विषयला हात
यावेळी बोलताना ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आमचा अमित कुठे तरी जात असताना त्यावेळी टोलनाका फुटला. त्यानंतर लगेच त्यांनी भाजपने टीका करायला सुरुवात केली. त्यावेळी भाजपने टीका करत म्हटले होते की, रस्ते बांधायलाही शिका आणि टोल उभे करायला पण शिका. पण मला असे वाटते की, भाजपने दुसऱ्या पक्षाचे आमदार न फोडता आपला पक्ष उभा करायला पण शिकावे. लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि त्यांना आतमध्ये आणायचे. मग ती लोक गाडीत झोपून जाणार, असा म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.
“मी तुला दिसलो का गाडीमध्ये? मी होतो का तिथे” या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वाक्याची नक्कल करत राज ठाकरे म्हणाले की, निर्लज्जपणाचा कळस महाराष्ट्रात सुरू आहे. अजित पवार वारंवार ते सरकारमध्ये सहभागी का झाले, याबाबतचे कारण सांगत असतात. त्यांच्या त्या स्पष्टीकरणावरही राज ठाकरेंनी निशाणा साधला. याबाबत महाराष्ट्राचा विकास करायचा आहे हे कारण अजित पवार देत असतात, पण हे ते साफ खोटे बोलत असल्याचे राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून सांगितले.
ज्यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्यानंतर हे सगळे टुनकन सत्तेत आले. कारण छगन भुजबळांनी तुरुंगात काय काय असते हे सांगितले असणार. त्यामुळे तिथे जाण्यापेक्षा आपण इथे जाऊ असे सांगितले असल्याने अजित पवारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याची टीका राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आली.