घरठाणेRaj Thackeray : "तुतारी मिळाली तर आता ती फुंका", राज ठाकरेंचा शरद...

Raj Thackeray : “तुतारी मिळाली तर आता ती फुंका”, राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

Subscribe

निवडणूक आयोगाने शरद पवार यांना तुतारी हे पक्ष चिन्ह दिले आहे. ज्याचे आज किल्ले रायगडावर अनावरण करण्यात आले. याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पवारांवर निशाणा साधला आहे.

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कल्याण, डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने मतदारसंघाची चाचपणी पक्षाकडून करण्यात येत असल्याने ते दौरे करत असल्याची माहिती त्यांच्याकडूनच देण्यात आली आहे. डोंबिवली येथे कार्यालयाला भेट दिल्यानंतर आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. शाहू-फुले केवळ यांचेच नाव घेणाऱ्या शरद पवार यांना तुतारी पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आल्याचा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. (Raj Thackeray criticizes Sharad Pawar over Trumpet symbol)

हेही वाचा… Rahul Narwekar : “द. मुंबईत भाजपाचाच खासदार”, लोकसभा निवडणुकीबाबत नार्वेकरांची स्पष्ट भूमिका 

- Advertisement -

डोंबिवली येथे प्रसार माध्यमांसमोर राज ठाकरे म्हणाले की, तुतारी मिळाली तर फुंका आता. छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला. मी त्यांना मागच्या वेळी एका मुलाखतीत विचारले होते की, फुले-शाहू-आंबेडकर नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाहीत? त्यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. पण छत्रपतींचे नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली, असा सणसणीत टोलाच त्यांनी यावेळी शरद पवारांना लगावला आहे.

महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल…

राज्यातील राजकीय परिस्थितीवरही यावेळी त्यांनी भाष्य केले आहे. याबाबत ते म्हणाले की, पुण्यात काही दिवसांपूर्वी 100 व्या नाट्य संमेलन कार्यक्रमात काही राष्ट्रवादीचे काही नगरसेवक मला भेटले. मी त्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विचारले कोणत्या गटाचे? तेव्हा तिघांनी सांगितले की शरद पवार गटाचे, तर बाकीचे दोघे म्हणाले की अजित पवार गटातून आहोत. असे विचित्र वातावरण महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हते. जनतेनेच या लोकांना वठणीवर आणले पाहीजे. लोकांनी जर यांना वठणीवर आणले नाही, तर महाराष्ट्राचा अजून चिखल होत राहिले, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -

महाराष्ट्राचे जुने दिवस आणायचे असतील तर जनतेने याचे भान ठेवले पाहीजे. केंद्रात पंतप्रधान मोदी यांना आणायचे, इथपर्यंत ठिक आहे. पण स्थानिक पातळीवर जर अशाप्रकारचे राजकारण होत राहिले, तर ते राज्यासाठी फार पोषक आहे, असे म्हणता येणार नाही. भविष्यात जे तरूण-तरूणी राजकारणात येऊ इच्छितात, त्यांना हेच राजकारण आहे, असे वाटू शकेल. त्यामुळे राजकारण आणखी खराब होत राहिल आणि हल्ली कोणताही राजकारणी अर्वाच्च भाषेत बोलू लागला तर त्याला प्रसार माध्यमांनी दाखवणे थांबवले पाहिजे. कारण तुम्ही दाखवता म्हणून ते वाटेल तसं बोलतात, असेही राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -