मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंच्या नावाने एक पत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मनसेकडून पाठिंबा देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सकाळपासून वरळी विधानसभेतील मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. ज्याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यामागचे नेमके सत्य काय? याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा आणि माहिम विधानसभेचे उमेदवार अमित ठाकरे आणि सुनेसोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशीही संवाद साधला. (Raj Thackeray explanation regarding letter that went viral in Worli Constituency)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रसरा माध्यमांनी वरळीत त्यांच्या नावाने व्हायरल झालेल्या पत्राबाबतची विचारणा केली. यावेळी ते म्हणाले की, आम्ही आमची निवडणूक लढवत आहोत. मतदारांनीही या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. हे पत्र खोटे आहे. मी गुढीपाडव्याच्या सभेत सांगितले होते, निवडणुकीत खूप गोंधळ होतील. चित्रविचित्र गोष्टींचे वापर होतील, त्याप्रमाणे ते होत आहे. अगोदरचे सत्ताधारी असतील किंवा आत्ताचे कुणालाच कुठल्या गोष्टींचा अंदाज येत नाही. असले प्रचार करून काही होणार नाही. जी काही माती खायची ती खा, पण मतदार या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्यामुळे वरळीत राज ठाकरे यांच्या नावाने व्हायरल झालेले पत्र पूर्णतः खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच, यावेळी त्यांना पैशांच्या वाटपावरूनही प्रश्न विचारण्यात आला आहे. याबाबत ते म्हणाले की, पैशांचा वापर याआधी सुद्धा होत होता, मात्र सध्या खूप उघडपणे होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. लोकांनी मतदान केले पाहिजे. ज्यांनी तुमच्या मतांची प्रतारणा केली, मतांचा अपमान केला त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे. लोकांचा विश्वास गमावला आहे, त्यामुळे हल्ले वैगेरे होत आहेत. दलबदलू प्रकाराचा राग एकमेकांवर निघत आहे. त्यामुळे मूळ मुद्द्यांना कोणीच थारा देत नाहीये, असेही राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.