Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : लोकांनी मते दिली पण आपल्यापर्यंत आली नाही, विधानसभा निकालाबाबत...

Raj Thackeray : लोकांनी मते दिली पण आपल्यापर्यंत आली नाही, विधानसभा निकालाबाबत राज ठाकरेंचा संशय

Subscribe

वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आज गुरुवारी (ता. 30 जानेवारी) मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीविषयी संशय व्यक्त करत मोठे विधान केले.

मुंबई : विधानसभा निकालाबाबत विरोधकांकडून अद्यापही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आजही राज्यातील विविध भागात ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा विधानसभा निकालाबाबत संशय व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला मते मिळाली, लोकांनी आपल्याला मते दिली, पण ती आपल्यापर्यंत आली नाहीत, असे म्हणत राज ठाकरेंनी मोठे विधान तर केलेच पण त्याचसोबतच यांनी निकालाच्या दोन महिन्यानंतर याबाबत संशय सुद्धा व्यक्त केला आहे. वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आज गुरुवारी (ता. 30 जानेवारी) मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी हा संशय व्यक्त केला. (Raj Thackeray expressed doubts about result of Maharashtra Assembly Elections 2024)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चिरफाड करत म्हटले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक लोक मला भेटली. पण या निकालानंतर राज्यात वेगळ्याच प्रकारचा सन्नाटा पाहायला मिळाला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, ज्या प्रकारच्या मिरवणुका झाल्या पाहिजे होत्या, त्या जागी फक्त राज्यभरात सन्नाटा पसरला होता. हे काय झाले? कसे झाले? असा कसा निर्णय आला? असा प्रश्न लोकांना पडला. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. ती व्यक्ती संघाशी संबंधित होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसले की त्यांना हे पटलेले नाही. त्यांनी फार छान वाक्य माझ्यासमोर म्हटले, ते मला म्हणाले की, “इतना सन्नाटा क्यू है भाई. कोई तो जीता होगा…” कोणीतरी जिंकले असेल ज्याच्यातून जल्लोष होईल. पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला हे कसले उदाहरण आहे, असे यावेळी राज ठाकरेंनी म्हटले.

राज ठाकरेंनी यावेळी कल्याण ग्रामीण माजी आमदार, मनसे नेते राजू पाटील यांचे उदाहरण देत म्हटले की, राजू पाटलांचे एक गाव आहे तिथे फक्त पाटलांनाच मतदान होते. साधारणतः 1400 मतदारांचे गाव आहे. तिथे फक्त यांनाच मतदान केले जाते. याआधी राजू पाटील यांचे भाऊ निवडणुकीला उभे होते, तेव्हा त्यांना मतदान झाले, त्यानंतर राजू पाटील उभे होते तेव्हा त्यांना मतदान झालं होतं जेव्हा ते खासदारकीला उभे होते तेव्हा देखील तिथे मतदान झाले मात्र यावेळी त्या गावातून राजू पाटलांना एक पण मत पडले नाही. अख्ख्या गावातून एकही मतदान पडत नाही, जी 1400 मते आहेत ती दरवेळी राजू पाटलांना पाडायची, त्या गावात एक मत नाही पडत, असे सांगत राज ठाकरेंनी या संपूर्ण निकालावर प्रश्न उपस्थित केला.

तर, मराठवाड्याचा एक नगरसेवक आहे. नगरसेवक झाला त्यावेळी त्याला 5500 मतदान त्याच्या भागात झाले होते, आता त्यांना विधानसभा निवडणुकीला 2500 मतदान झाले. विधानसभा निवडणुकीत अनेक असे नेते आहेत, ज्यांना ते हरले यावर विश्वास बसत नाही. इथे निवडून आलेल्यांना ते निवडून आल्यावर विश्वास बसत नाहीये. ते रात्री बायकोला चिमटा काढ म्हणातात, असे म्हणत त्यांनी विजयी नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांविषयी म्हटले की, बाळासाहेब थोरात ते तर 7 वेळा आमदार झाले. ही त्यांची आठवी टर्म होती. ते 7 निवडणुकींमध्ये 70-80 हजार मतांनी निवडून आले, पण यावेळी त्यांचा 10 हजार मतांनी पराभव. उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाल्याने बोलत आहेत, पण मी नाही अख्खा महाराष्ट्र बोलत आहेत. जे निवडून आले त्यांचे फोन आले की त्यांना शॉक बसला आहे, असेही यावेळी ठाकरेंकडून सांगण्यात आले.

हा संशोधनाचा विषय…

तसेच, भाजपाला 132 जागा मिळाल्या, मागच्या वेळी 2019 मध्ये 105 आणि 2014 मध्ये 122 जागा होत्या. त्यांचे ह गणित आपण समजू शकतो. पण अजित पवार 42, त्यांच्या 4-5 जागा येतात की नाही असे असताना त्यांना इतक्या जागा कशा आल्या. दुसरीकडे अजित पवार असो किंवा छगन भुजबळ असो ज्यांच्या जीवावर सगळे मोठे झाले त्या शरद पवारांच्या केवळ 10 जागा आल्या, हे सर्व न समजण्यापलिकडे आहे. लोकसभेत काँग्रेसचे 13 खासदार निवडून आले. एका खासदाराच्या खाली 6 आमदार येतात. त्यामुळे त्यांचे किमान आमदार निवडून यायला हवे होते, पण त्यांचे फक्त 15 आमदार आले. शरद पवारांचे आठ खासदार आले होते, त्यांचे 10 आमदार आले. पण ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आला त्यांचे 42 आमदार आले, हा खरा संशोधनाचा विषय आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी आपले मत व्यक्त केले.

लोकांनी आपल्याला मतदान केले पण…

लोकांनी आपल्याला मतदान केले आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही, असा आरोपच यावेळी राज ठाकरेंकडून करण्यात आलेला आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले पण केलेले मतदान कुठेतरी गायब झाले, अशाप्रकारे निवडणूक लढवायची असेल तर निवडणूक न लढवलेल्या बऱ्या. कुणीही कुठल्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो, असे म्हणत यावेळी राज ठाकरेंनी निवडणूक निकालाबाबत प्रथमतःच स्पष्टपणे खंत व्यक्त केली.