मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया पूर्ण, प्रकृतीबाबत रूग्णालयाच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात येणार

Doctors advise Raj Thackeray to rest

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावरची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. मुंबईतील लिलावती रूग्णालयात राज ठाकरेंवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. जलील पारकर आणि त्यांची टीम दुपारी ४ वाजता अधिकृत माहिती देणार आहेत. पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. त्यानुसार ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.

खरंतर जूनच्या पहिल्याचं आठवड्यात त्यांच्या पायावरील शस्त्रक्रिया पार पडणार होती. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ही शस्त्रक्रिया लांबणीवर पडली होती. अखेर लिलावती रूग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली असून दुपारी चा र वाजता त्यांच्या प्रकृतीबाबत रूग्णालयाच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली. पण त्याआधी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी देवाकडे साकडं घातलं. मोरया गोसावी गणपती मंदिरात आरती करून प्रार्थना करण्यात आली. तसेच भीमाशंकरमध्ये सुद्धा अभिषेक करण्यात आला.

मे महिन्यात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांनी पुणे दौरा अर्धवट सोडला होता. तसेच ते मुंबईला परतले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचं जाहीर केलं होतं. येत्या ५ जून रोजी राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अयोध्या दौऱ्याला जाणार होते. परंतु पायाचं दुखणं अधिकच वाढल्याने डॉक्टरांनी शस्त्रकियेचा सल्ला दिला होता.

दरम्यान, विधानपरिषदेची निवडणूक सुरू असतानाच राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे मनसे आमदार राजू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मनसेचे एकमेव शिलेदार राजू पाटील हे मतदानासाठी विधानसभेमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास दाखल झाले. तसेच त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आम्हाला कोणीही गृहित धरू नये असा इशारा राजू पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचं चित्र दिसत आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही मतदान केल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं.


हेही वाचा : राज ठाकरे आज लिलावती रुग्णालयात होणार दाखल, लवकरच होणार शस्त्रक्रिया