भोंग्यांचा विषय फक्त एक दिवसाचा नाही, आंदोलन सुरुच राहणार, राज ठाकरे भूमिकेवर ठाम

abu azami Support from brij bhushan to oppose Raj Thackeray's visit to Ayodhya

राज्यातील भोंग्यांचा विषय हा फक्त एक दिवसाचा नाही तर हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची ठाम भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. राज्यात ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत असा अल्टिमेटम देण्यात आला होता. राज्य सरकारने भोंगे हटवले नसल्यामुळे मनसैनिकांनी राज्यातील मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवली आहे. यानंतर पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरु केली आहे. राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. हा सामाजिक विषय आहे याला धार्मिक रंग देऊ नका आम्हीसुद्धा धार्मिक रंग देऊ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मनसैनिकांना आवाहन केलं आहे. जोपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरत नाहीत तोपर्यंत मनसेचे हनुमान चालिसा आंदोलन सुरुच राहील. राज्यातील मशिदींवर जे अनधिकृत भोंगे आहेत ते हटवण्यात यावेत असे राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र मनसैनिकांना हिंदू बांधवांना सांगायचे आहे, हा विषय एक दिवसाचा नाही. ज्या ठिकाणी मशिदींवरील भोंगे वाजतील त्याच्या समोर हनुमान चालीसा वाजलीच पाहिजे. तसेच १३५ मशिदींवर मुंबई पोलीस काय कारवाई करणार?, कारवाई करणार की नाही? याबाबत समजेलच असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सकाळपासून राज्यातून आमच्या नेत्यांना फोन येत आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरुनसुद्धा फोन येत आहेत. माहिती देत आहेत. पोलिसांचे फोन येत आहेत. ते काही गोष्टी सांगत आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांना पोलीस पकडत आहेत. नोटीस पाठवत आहेत. ही गोष्ट आमच्याबाबत का होत आहे. तोच प्रश्न आमचा आहे. जे कायद्याचे पालन करत आहेत. त्यांना तुम्ही सजा देणार, जे कायद्याचे पालन करत नाहीत त्यांना तुम्ही मोकळीक देणार, तरी आज एवढं निश्चित सांगेल की, जवळपास ९० ते ९२ टक्के ठिकाणी सकाळची अजान झाली नाही. सर्व ठिकाणी आमची लोकं तयार होते. परंतु खास करुन ज्या काही मशिदींमध्ये मौलवी होते त्यांचे आभार मानेल त्यांना आमचा विषय समजला आहे. असे राज ठाकरे म्हणाले.

१३५ मशिदींवर ५ वाजण्यापूर्वीच अजान लावण्यात आली

मुंबईच्या रिपोर्ट प्रमाणे मुंबईत १ हजार १४० मशिदी आहेत. त्यातील १३५ मशिदींवर ५ वाजण्यापूर्वीच अजान लावण्यात आली. काल पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की, आम्ही सर्व मशिदींमधील मौलवींसोबत बोललो आहेत. ते सकाळी अजान कोणी लावणार नाही परंतु १३५ मशिदींवर सकाळी अजान झाली त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येणार आहे की, आमच्या पोरांनाच कारवाईला सामोरे जावे लागेल असाल सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

हा विषय फक्त श्रेयवादाचा नाही.

हा विषय फक्त श्रेयवादाचा नाही. तर हा विषय सगळ्यांनी हाताळला तर सगळ्यांचा आहे. आमच्यामुळे ९२ टक्के ठिकाणी अजान झाली नाही. मला श्रेय घ्यायचे नाही. मला असे श्रेय घेण्याची इच्छा नाही. आम्ही फक्त बोललो लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली, लोकांना कळाली, अनेक मौलवींना हा विषय समजला आहे. पोलिसांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्यामुळे त्यांचेही धन्यवाद, माध्यमांचेही आभार राज ठाकरेंनी मानले आहेत.


हेही वाचा : Raj Thackeray Loudspeakers Row : भोंग्याविरोधात मनसे आक्रमक; राज्यभरात कडक बंदोबस्त