राजकारणात येण्यासाठी राज ठाकरेंकडून महिलांना साद, महिला दिनी केलं मोठं आवाहन

Women Leaders in Maharashtra Politics | राज ठाकरेंनी महिलांना राजकारणात येण्यासाठी साद घातली होती. आता पुन्हा महिला दिनीच त्यांनी ही साद घातल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महिलांची संख्या वाढतेय का हे पाहावं लागेल.

raj thackeray
महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे.

Women Leaders in Maharashtra Politics | मुंबई – आज जागतिक महिला दिन साजरा केला जातोय. या निमित्ताने जगभर विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा गौरव होत आहे. राजकारणातही महिलांचा सहभाग वाढावा असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरेंनी आज एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी महिलांना राजकारणात येण्यासाठी साद घातली आहे. याआधीही राज ठाकरेंनी महिलांना राजकारणात येण्यासाठी साद घातली होती. आता पुन्हा महिला दिनीच त्यांनी ही साद घातल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महिलांची संख्या वाढतेय का हे पाहावं लागेल.

राज ठाकरेंनी काय म्हटलंय?

सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.

१००, १५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती… आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे.

म्हणूनच आता स्त्रियांनी राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे. पुन्हा एकदा सर्व महिलांना, जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..