अक्षय्य तृतियेला राज्यभर महाआरती करा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी याबाबतची माहिती दिली.

raj thackeray

हनुमान जयंती नंतर आता राज्यात अक्षय्य तृतियेला महाआरती करा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांनी दिले आहेत. मंगळवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी हे आदेश दिले आहेत. या संदर्भातील माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

“राज ठाकरेंनी नेते मंडळी, सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि, विभाग अध्यक्ष मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या विभागातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत १ मे ला औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेची काय तयारी करायची याची माहिती दिली. ती सभा कशी मोठी होईल याबाबत सूचना केल्या आहेत. ५ जूनला अयोध्येला जाणार आहेत, त्याचं नियोजन सुरु आहे. त्यामुळे काही सूचना केल्या आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही पुन्हा बसतोय. ५ जून दौरा कसा करावा, तिथे गेल्यावरती तिथे काय करायचं, यावर चर्चा सुरु आहे,” असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

३ मेला अक्षय्य तृतिया आहे, त्यावेळेस आमची लोकं परवानगी घेऊन हनुमान चालीसा असेल, महाआरती असो लाऊडस्पीकरवर लावणार. याबाबतचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत, असं नांदगावकर यांनी सांगितलं.

राज्याच्या आणि केंद्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिलंय

राज ठाकरे यांच्या सुरक्षेसंदर्भात मी गृहमंत्र्यांना आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ते पत्र त्यांना पोहोचेल. या पत्रासंदर्भातील कल्पना राज ठाकरेंना दिली आहे. सरकार काय करतं ते बघू. गृहमंत्र्यांची बैठक सुरु आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले.