राज ठाकरे तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर, कार्यकरणीत फेरबदलाची शक्यता, मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आज पासून नाशिक दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचे नाशिक शहरात आगमन होईल. त्यानंतर शनिवारी (दि.२०) सकाळी नाशिक मधील तिनही विधानसभा मंतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर १० वाजता पत्रकार परिषद घेतील. त्यांनंतर दिवसभर शहरातील विभाग अध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, महिला सेना आदी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक केली जाणार आहे. त्यानंतर राज ठाकरे निमा पॉवर प्रदर्शनाला भेट देतील. तर दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी रविवारी (दि.२१) जिल्ह्यातील शेतकरी संघटना, क्रेडाई संघटना, वास्तुविशारद संघटना तसेच ग्रामीण भागातील पक्षाचे पदाधिकारी यांच्यासोबत राज ठाकरे बैठक करतील.

कार्यकरणीत फेरबदल

शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप तरी तो स्वीकारला गेल्याचे वृत्त नाही, किंबहुना तशी राज ठाकरे यांची कार्यपद्धती देखील नाही. त्यामुळे रिक्त झालेल्या शहराध्यक्ष पदावर एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी मिळते की खांदेपालट होते हे बघणे महत्वाचे असेल. तसेच जिल्ह्याची व्याप्ती बघता नांदगांव, येवला, मालेगाव, चांदवड या तालुक्याच्या अनुषंगाने नवीन जिल्हाध्यक्षाची वाढ कार्यकारणीत होण्याची शक्यता आहे. त्याच सोबत राजपुत्र अमित ठाकरे अध्यक्ष असलेल्या मनविसेतही काही खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनपा निवडणुकीची तयारी 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये बैठका घेणार आहे. त्या बैठकीच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राजमार्ग दाखवतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई, नाशिक, पुणे या महत्त्वाच्या महापालिकांसह राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची दाट  शक्यता निर्माण झाली आहे. भाजपा, शिवसेना, ठाकरे गट यांनी त्याच अनुषंगाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्वपूर्ण ,मानला जात आहे.