मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून राज ठाकरेंनी भलीमोठी पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरेंनी मनातील खंत, मनातील भावना व्यक्त केलेली असतानाच त्यांनी त्यांच्या पोस्टमधून पक्षातील कार्यकर्त्यांना संकल्प ठरवून देत महत्त्वाचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे, असे ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. त्यामुळे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे आणि मतांसाठी इतर पक्ष, अशी भावना मनसैनिकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्याचमुळे आता राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. (Raj Thackeray resolution for party workers on the occasion of New Year 2025)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून नववर्षाच्या शुभेच्छा तर दिल्याच आहेत. पण त्यासोबतच त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करत म्हटले की, “महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मी मागे म्हटले तसे मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावले तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन, ते आपण करत आहोतच. पण राज्यात महिलांवर जे अत्याचार होत आहेत, त्याच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरू करा. महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा आणि तरीही काही घडले नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाना चांगलं फोडून काढा.” असा आदेशच राज ठाकरेंनी पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.
हेही वाचा… Raj Thackeray : मराठी माणूस हा केवळ…, नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत ठाकरेंनी व्यक्त केली खंत
“महागाईने होरपळलेल्यांना दिलासा द्यायला हवा, यासाठी साठेबाजी होत नाहीये ना, हे पाहून त्याची सूचना संबंधित खात्याना करा आणि त्याच्या जोडीला शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आपल्या शाखा, कार्यालयं पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा. आणि हो, हे सगळं करताना सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार प्रसारासाठी वापरायचा आहे पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना, त्याच्या अधीन जात नाही आहोत ना हे पहा.” असा संकल्प मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना करून दिला आहे. तर, “लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच. तोपर्यंत नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा !” असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे , कारण या शतकातील, पाव शतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की २५ वर्षांपूर्वीच… pic.twitter.com/T7Wp8WTHra
— Raj Thackeray (@RajThackeray) January 1, 2025
विधानसभा निवडणुकीत पराभवाचा भोपळा मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत कोणतीही भूमिका किंवा आपले मत स्पष्टपणे व्यक्त केलेले नाही. तर दुसरीकडे त्यांचे कार्यकर्तेही निवडणुकीनंतर शांत असलेले पाहायला मिळत आहेत. मात्र, मराठी माणूस किंवा महिलांविषयी कोणताही प्रश्न असला सर्वात पुढे मनसे कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी पाहायला मिळतात. मात्र, त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या या मदतीचे मतांमध्ये परिवर्तन झालेले पाहायला मिळत नाही, ज्यामुळे कठीण प्रसंगावेळी सुद्धा मनसेची आठवण काढू नका, अशी भूमिका मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मांडली होती. मात्र, आता महानगरपालिकांच्या निवडणुकींना लक्षात घेता राज ठाकरेंनी पुन्हा पक्षातील कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.