Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा घाट, राज ठाकरे यांची टीका

महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा घाट, राज ठाकरे यांची टीका

आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा. बरं चाललंय सरकारचं.

Related Story

- Advertisement -

आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. मनसेनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौर्‍यात या निमित्ताने वाढ झाली आहे. रविवारी ते पुन्हा एकदा पुण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा घाट असल्याची टीका केली. त्यांनी पुण्यातल्या मनसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातल्या ओबीसी आरक्षणासह अनेक प्रश्नांवर आपली मते मांडली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. ओबीसी जनगणना होईपर्यंत निवडणुकांना निश्चित स्थगिती दिली पाहिजे. पण त्यामुळे हे काम पटकन होणार असेल तर याला स्थगिती मला मान्य आहे. निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचे असेल, त्यात काही काळंबेरं असेल तर तेही आपल्याला समजावून घ्यायला हवे. सगळ्या महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे पण सरकारचे चालू आहेत. मला असे वाटते की पुढे असे नको व्हायला की ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही गोष्टी साध्य करून घेत आहे. पण ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जनगणना वगैरे गोष्टी झाल्यानंतर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही. जातीनिहाय जनगणनेबद्दल विचारणा झाली असता राज म्हणाले, खरंतर ही काही अवघड गोष्ट नाही. अशा प्रकारची जनगणना करण्यासाठी सरकारकडे पुरेशी यंत्रणा आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाची भीती दाखवली जातेय

- Advertisement -

या लॉकडाऊनमुळे जे चाललं ते बरं चाललं असं सर्व सरकारला वाटतंय. आंदोलने नाही, मोर्चे नाही, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, रस्त्यावर कुणी उतरायचे नाही. काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा. बरं चाललंय सरकारचं. केवळ कोरोनाची भीती दाखवली जात आहे. तिसरी चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?, असा सवालही त्यांनी केला.

…तरच शाळा सुरू करा

- Advertisement -

यावेळी त्यांनी शाळा सुरू करण्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुलांचं लसीकरण झालं नाही. पुनावालांचंही स्टेटमेंट आहे. पण लसीकरण पूर्ण झालं नसेल तर शाळा कशा उघडणार? लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा, असेही ते म्हणाले.

- Advertisement -