आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!

राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा, तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आला नाही, राज यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

cm uddhav thackeray slams raj thackeray on hindutva and loudspeaker

मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर राज्यातील विविध भागात मनसैनिकांचे अटकसत्र सुरू झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी चांगलेच आक्रमक झाले. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याविरोधात सुरू असलेल्या पोलीस कारवाईला विरोध करत आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा देत राज ठाकरे यांनी सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही, उद्धव ठाकरे तुम्ही सुद्धा नाही!, असे बजावले आहे.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटिसी बजावत तर काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली. मनसेचे मुंबईतील नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावरही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पोलीस कारवाई विरोधात संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे, त्याप्रकारे मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का, असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केले आणि अनेकांना तुरुंगात डांबले हे कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी त्यांची धरपकड केली आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

संदीप देशपांडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलीस शोधत आहेत. जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार’ आहेत. महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत, असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

बृजभूषण म्हणजे उत्तर प्रदेश नाही– बाळा नांदगावकर

आमचे अयोध्येला जायचे निश्चित झाले आहे. 5 जून तारीख आधीच ठरली आहे. तिकिटांचे आरक्षण झाले आहे. सुरक्षेसंदर्भात बोलणी सुरू आहे. भाजपचे खासदार बृजभूषण सिंह एकटेच बोलत आहेत. ते बोलतात म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश बोलतोय असे नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारची जनता आमच्या स्वागताला तयार आहे. यावर टीकाटिप्पणी करणे योग्य नाही. त्यातून तेढ निर्माण करणे योग्य नाही, असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

बृजभूषण सिंह यांना भाजप समज का देत नाही? प्रश्नावर समज द्यावी, न द्यावी हा भाजपचा विषय आहे. पण आम्ही हिंदुत्व, भोंगे आणि हनुमान चालीसेचा मुद्दा हाती घेतल्यानंतर सर्व जागे झाले आहेत. हनुमान चालीसा म्हणत असून भगवा झेंडा घेऊन जात आहेत. नाना पटोले आयोध्येला, आदित्य ठाकरे अयोध्येला जात आहेत. काही लोक मंदिरात जात आहेत, तर काही लोक हनुमान चालीसा म्हणताना दिसत आहेत, असेही बाळा नांदगावकर म्हणाले.