घरमहाराष्ट्रमनसेचा १७वा वर्धापन दिन : आपल्या वाटेला कोणी जायचं नाही... मुख्यमंत्रीपदावरुन जावं...

मनसेचा १७वा वर्धापन दिन : आपल्या वाटेला कोणी जायचं नाही… मुख्यमंत्रीपदावरुन जावं लागतं; राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होत आहे. गडकरी रंगायतन येथे होणाऱ्या सभेत मनसेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण करत राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
– मनसैनिकांना शुभेच्छा आणि आभार. कोणतीही सत्ता नसताना तुमचा जो उत्साह आहे तो पक्ष पुढे घेऊन जात असतो.
– संदिप देशपांडे वर हल्ला करणाऱ्यांना आधी कळेल की हे त्यांनी केलं आणि मग सगळ्यांना कळेल की हे त्यांनी केलं. माझ्या मुलांचं रक्त असं वाया जाऊ देणार नाही.
– १७वा वर्धापन दिन साजरा करताना १६ वर्षांचा आढावाही घेणं गरजेचं आहे.
– १३ आमदार निवडून आले होते ते काय सोरटवर आले होते का?
– सभेला गर्दी होते पण मनसेला मतं पडत नाहीत. हा प्रोपोगंडा आहे.
– भरतीनंतर ओहोटी येते ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भाजपनेही लक्षात घेतलं पाहिजे. आज भरती सुरु आहे. उद्या ओहोटीही येऊ शकते.
– राजू पाटील यांचा उल्लेख करुन राज म्हणाले, एक ही है, लेकीन काफी है. विधानसभा भरेल तेव्हा काय होईल? असाही सवाल राज यांनी उपस्थितांना केला.
– सभेला होणारी गर्दी मतात रुपांतरीत होत नाही. हा ठरवून केलेला प्रचार आहे.
– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळे ६० ते ७० टोलनाके बंद झाले. एकही आंदोलन अर्धवट सोडलेले नाही.
– ज्यांनी आपल्या जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती, त्या शिवसेना-भाजपला कोणी विचारत नाही, तुमच्या घोषणेचं काय झालं? मात्र मनसेला विचारणार. हा ठरवून केलेला अपप्रचार आहे.
– मनसेने एकही आंदोलन अर्धवट सोडले नाही, भोंग्याचा समाचार २२ तारखेला – राज ठाकरे

- Advertisement -

– मनसेच्या आंदोलनानंतर टेलिफोन कंपन्यांनी मराठी भाषेचा वापर केला.
– मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट लावले जावे हे हातजोडून सांगितलं. ऐकलं नाही. मग हात सोडून सांगितलं.
– आता दर आठवड्याला एवढे मराठी चित्रपट तयार होत आहेत, कोणा कोणाला स्क्रिन्स देणार?
– महाराष्ट्रातील दुकानांवरील पाट्या मराठीत असल्या पाहिजे यासाठी आंदोलन केले. पाट्या मराठीत झाल्या.
– गुजरात, तामिळनाडू इथं कधी त्यांच्या भाषेत पाट्या लावल्या गेल्या पाहिजे, असं आंदोलन कधी ऐकलं का? महाराष्ट्रातच मराठीसाठी असं आंदोलन करावं लागतं. कारण ते तुम्हाला गृहित धरतात.
– स्वतःला सोकॉल्ड हिंदूत्ववादी पक्ष म्हणवतात ते या आंदोलनावेळी कुठे होते? चिंतन!
– तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेता, आमच्या या आंदोलानावेळी तुम्ही कुठे होते?
– भोंग्याच्या विरोधात जेव्हा आंदोलन झालं तेव्हा १७ हजार मनसैनिकांवर केसेस केल्या गेल्या. आपल्या वाट्याला कोणी जायचं नाही. मुख्यमंत्रीपदावरुन जावं लागलं, असा टोला राज यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
– हा विषय २२ मार्चचा असल्याचं सांगून राज यांनी त्यावर अधिक बोलणं टाळलं. मात्र २२ मार्चला राज कोणाचा आणि कसा समाचार घेणार त्याची ट्रेलर त्यांनी यातून दाखवला.
– १९५२ साली जनसंघ स्थापन झाला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या खस्ता खाल्ल्या त्यातून २०१४ चं बहुमत भाजपला मिळालं आहे.
– आपण सत्तेपासून दूर नाही. हे मळभ दूर होईल. मी तुम्हाला फक्त आशा दाखवत नाही. मला माहित आहे, हे कसं होणार आहे.
– दोन वर्षांपासून दहावीला नापास झाल्यासारखं वाटायला लागलं आहे. असं वाटतं आता मार्चमध्ये निवडणूक होणार. मार्च आलं की वाटतं आता ऑक्टोबरमध्ये नक्की होणार. परत मार्चची आशा लागते. दोन वर्षांपासून महापालिका निवडणुका लांबत चालल्या आहेत.
– महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न घेऊन मी या पक्षाचे नाव महाराष्ट्र नवनिर्माण ठेवले आहे. ते आपल्याला करायचे आहे.
– सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे, ते आजपर्यंत मी कधीही पाहिले नाही. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले तोच हा महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न पडतो. राजकारणात इतकी खालची भाषा कधीही पाहिली नव्हती.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. मतदरांनाही त्यांना पाठिंबा दिला. सुरुवातीला मनसेचे १३ आमदार निवडून आले. नाशिक महापालिकेची सत्ता मनसेच्या हाती आली. सत्तेचं हे सुख राज ठाकरे यांच्या जवळ फार काळ टिकले नाही. आता मनसेचा एकच आमदार आहे. नाशिक पालिकेची सत्ता राहिलेली नाही. मनसे आणि राज यांचे अस्तित्त्व काही संपलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -