भोंगे उतरेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार-राज ठाकरे

पाच वेळा हनुमान चालीसा लावण्याचे कार्यकर्त्यांना आदेश

हिंदूंच्या सणांना लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, तीही आठ-दहा दिवसांची मिळते, मात्र पोलीस यांना ३६५ दिवस परवानगी कसे देतात, असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी जोपर्यंत मशिदींवरील भोंग्यांचा विषय कायमचा संपत नाही, तोपर्यंत भोंग्यांच्या विरोधातील आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली. ज्या मशिदींतील भोंग्यांचे आवाज कमी होणार नाहीत किंवा अनधिकृत भोंगे काढले जाणार नाहीत आणि जिथे जितक्या वेळेला अजान, बांग होते तिथे दुप्पट आवाजात पाचही वेळेला हनुमान चालीसा लावा, असे आदेशही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बुधवारी दिले.

मशिदींसमोर बुधवारपासून हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. त्यानुसार कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावायला सुरुवात केली, मात्र पोलिसांनी मंगळवारपासून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली असून या आंदोलनाबाबत अधिक स्पष्टीकरण येण्यासाठी राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी हनुमान चालीसा दुप्पट आवाजात लावण्याच्या सुरू केलेल्या आंदोलनामागची भूमिका मौलवी, सरकार आणि पोलिसांनाही समजली असल्याचा दावा ठाकरेंनी केला. ते म्हणाले की, हा विषय श्रेयवादाचा नाही. मला याचे श्रेयदेखील नको. हा समाजाचा विषय आहे. तसेच केवळ मशिदींवरचेच नव्हे तर मंदिरांवरील भोंग्यांचाही त्रास होत असेल तर तो बंद व्हायला हवा.

आज ९० ते ९५ टक्के मशिदींमध्ये लाऊडस्पीकर लावून अजान झाली नाही किंवा लाऊडस्पीकरच्या कमी आवाजात ती झाली. त्या मशिदींमधील मौलवींचे आभार. त्यांना विषय समजला आहे. मुंबईत १ हजार १४० मशिदी आहेत, त्यापैकी १३५ मशिदींमध्ये सकाळी ५च्या अगोदर अजान झाली. त्यांच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हा विषय फक्त सकाळच्या अजानपुरता मर्यादित नाही. दिवसभर चार ते पाच वेळा बांग दिली जाते. ती जर परत त्यांनी दिली तर आमचे लोक त्या त्या वेळी हनुमान चालीसा वाजवणार, असा इशारा देत ठाकरे म्हणाले की, तुम्ही ३६५ दिवसांची परवानगी कशी देऊ शकता? आम्हाला एका दिवसाची परवानगी देणार आणि यांना ३६५ दिवसांची देणार हे कशासाठी? यांनी पण रोजच्या रोज परवानगी मागितली पाहिजे.

पोलीस आमच्या लोकांची धरपकड कशासाठी करत आहेत? ती पण मोबाईलच्या काळात. संवादाची साधने एवढी असताना माणसं पकडून काय होणार? हे अजून ६०-७० दशकांचा विचार करताय का? एवढा मूर्खपणा? हे कोणत्या काळात जगत आहेत याची माहिती नाही, असा टोला राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना लगावला.

महाराष्ट्र सैनिकांना, हिंदू बांधवांना हेच सांगायचे आहे की हा एका दिवसाचा विषय नाही. हनुमान चालीसाशिवाय समजणार नसेल तर दुप्पट आवाजात वाजवा. मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस काय कारवाई करणार हे एकदा समजू दे. ते धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही राहावे लागेल. ३६५ दिवस आणि दिवसभरात चार ते पाच वेळा भोंगा लावणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचा. त्यामुळे पोलिसांनी हे भोंगे खाली आणले पाहिजेत. जी प्रार्थना करायची ती मशिदीत करा. हा एका दिवसाचा विषय नाही. ४ तारीख पकडू नका. जोपर्यंत विषय निकाली लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही राज ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.

त्या 135 मशिदींवर कारवाई करा
मुंबईमध्ये १ हजार १४० मशिदी आहेत. त्यापैकी १३५ मशिदींमध्ये अजान पहाटे पाच वाजायच्या आत लावली गेली. मग या १३५ मशिदींमध्ये भोंगे वाजले त्यावर कारवाई करणार की नाही? की आमच्याच मुलांना उचलणार? हा श्रेयाचा विषय नाही. हा सगळ्यांचा विषय आहे.
-राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना