मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदानाचा दिवस पार पडला. यावेळी राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. अशामध्ये यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत असताना स्वतंत्र निवडणुकीत उतरलेल्या राज ठाकरे यांचा मनसे फॅक्टर काय परिणाम करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Raj Thackeray will become king maker in Maharashtra Election 2024)
हेही वाचा : Maharashtra Elections 2024: पालघर जिल्ह्यात सरासरी 59.31% टक्के मतदान
लोकसभेत भाजपला आणि महायुतीला पाठींबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. अशामध्ये मनसेने राज्यात अनेक मतदारसंघात आपले 128 शिलेदार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. राज ठाकरे यांनी राज्यभर दौरे करून अनेक प्रचारसभा घेत मनसेच्या उमेदवाराला जिंकून देण्याचे आवाहन केले आहे. यावेळी प्रचार सभांमध्ये त्यांनी फक्त महाविकास आघाडीवरच नव्हे तर महायुतीच्या उमेदवारांवरही टीका केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी लोकसभेत पाठींबा दिलेल्या भाजपबद्दल कमी भाष्य केले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे काय कमाल करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले.
एक्झिट पोल काय सांगते?
अनेक संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये मनसेला कमी जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या एक्झिट पोल्सनुसार मनसेला एक अंकी जागाच मिळू शकतात, असे सर्वच पोल्समधून समोर आले आहे. मुंबईत मनसे मोठी खेळी करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर राज्यात अनेक जागांवर मनसे ही महायुती आणि मविआसाठी डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा आहे. इतर श्रेणीत मनसेला टाकण्यात आले असून इलेक्ट्रोरल एजच्या एक्झिट पोलमध्ये मनसे आणि इतर पक्षांना अंदाजे 20 जागा मिळतील. तर, दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार मनसेला 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, पोला डायरीच्या अंदाजानुसार, मनसे, वंचित, एमआयएमसह अपक्षांच्या पारड्यात 12-29 जागा पडण्याची शक्यता आहे. पण एकही पोलमध्ये मनसेला स्वतंत्र असे स्थान देण्यात आलेले नाही. दरम्यान, लोकसभेत राज ठाकरे यांनी भाजप महायुतीला पाठींबा दिला होता. नरेंद्र मोदी यांच्या विझनला त्यावेळी पाठींबा दिल्याचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. तसेच, एका मुलाखतीत ते, ‘यावेळी भाजपाचा मुख्यमंत्री होईल तर 2029 मध्ये मनसेचा मुख्यमंत्री असेल,’ असा दावादेखील त्यांनी केला आहे. त्यामुळे 128 पैकी किती जागांवर मनसे विजयी होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited by Abhijeet Jadhav