घरताज्या घडामोडीस्व. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची धमक राज ठाकरेंमध्येच - नितेश राणे

स्व. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची धमक राज ठाकरेंमध्येच – नितेश राणे

Subscribe

स्व. बाळासाहेबांना माननारा एक वर्ग आहे. तो फक्त बाळासाहेबांचे विचार मानतो. मात्र आताची शिवसेना ही बाळासाहेबांची राहिलेली नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री असला तरी शिवसेनेचे विचार ते पुढे घेऊन जातील का? याबाबत शिवसैनिकांच्या मनातच संभ्रम आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाअधिवेशनात हिंदुत्त्वाच्या विचारावर चालणार असल्याची भूमिका मांडली आहे. त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. तसेच राज ठाकरे यांच्यामध्येच स्व. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याची धमक असल्याचे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना राणे यांनी आपले मत मांडले.

नितेश राणे पुढे म्हणाले की, “शिवसेना सत्तेत असूनही बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान होत आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास काल बाळासाहेबांची जयंती होती. तरी कुठेही राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले नाही किंवा सोशल मीडियावर पोस्ट, ट्विट टाकले नाही. मात्र हेच जर शिवसेनेने काँग्रेसच्या विचारधारे विरोधात एखादे वक्तव्य केले तर काँग्रेसकडून लगेच दबाव टाकला जातो. बेधडक वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना देखील काँग्रेसच्या दबावापुढे झुकत माफी मागावी लागली आहे.”

- Advertisement -

राज ठाकरे यांना मी अनेक वर्षांपासून जवळून ओळखतो. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारे राज ठाकरेच आहेत. शिवसेनेला राज ठाकरेच पुढे घेऊन जातील, हे ठरलेले होते. मात्र उद्धव ठाकरे मधेच आल्यामुळे ते बाजुला झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आमचे अंतरंग भगवे असल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या कृतीतून ते दिसत नाही. आगामी काळात ज्या महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत, तिथे शिवसेना कुठेही दिसणार नाही. सामान्य जनता आता शिवसेनेच्या विरोधात कुजबूज करत आहे, मतदानाच्या माध्यमातून जनता हे दाखवून देईल, असेही राणे यावेळी म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -