राज ठाकरे उद्यापासून मनसे पदाधिकारी – कार्यकर्त्यांना करणार ऑनलाईन मार्गदर्शन

राज्यातील राजकीय उलथापालथ सुरू असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांच्या पायावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. त्यामुळे आता राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरे उद्यापासून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राजकीय परिस्थिती आणि आगामी नगरपालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे महाराष्ट्रातील या संपूर्ण राजकीय नाट्यासंदर्भात काय भूमिका घेतात, हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज ठाकरेंशी फोनवरून संवाद साधला होता. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेच्या एकमेव आमदाराने शिंदे गट- फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात मनसेचे आमदार राजू पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

दरम्यान, मनसेला मंत्रिपद देण्यास रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी विरोध दर्शविला आहे. मनसेचा सत्ता स्थापनेत काही संबंध नाही. त्यामुळे मनसेला मंत्री पद देण्याचा प्रश्न येत नाही, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले होते. मात्र, रिपाईला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एखादे मंत्रीपद मिळेल, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा : स्थानिक निवडणुकांमध्ये २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार, जयंत पाटलांची माहिती