मुंबईच्या नेस्को मैदानात आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार, पक्षाला मिळणार नवी दिशा?

MNS Raj Thackeray arrange public meeting in Pune to decide Strategy

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतील नेस्को ग्राऊंडवर धडाडणार आहे. मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात आज ते कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत. त्यामुळे आजच्या भाषणात ते कोणत्या मुद्द्यांवर बोलतात, कोणावर टीका करतात याकडे अवघ्या महाराष्ट्र लक्ष लागलं आहे.

भारत जोडो यात्रा, हरहर महादेव सिनेमाच्या निमित्ताने उद्भवलेला वाद, स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या अपमानजनक वक्तव्यामुळे उद्भवलेला वाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अपमान या सर्वांवर ते बोलण्याची शक्यता आहे. मशिदीवरील लाईड स्पीकरचा मुद्दा मनसेने उचलून धरला होता. मशिदीच्या लाऊड स्पीकरविरोधात उगारलेल्या आंदोलनात त्यांना बऱ्यापैकी यश आलं होतं. त्यामुळे आजच्या भाषणात ते कोणता मुद्दा उगारून काढतात हे पाहावं लागणार आहे.

येत्या काळात आता महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी इतर पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरेही आता पालिका निवडणुकीच्या तयारी लागण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज फुटू शकतो, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

औरंगाबादेत घेतली होती शेवटची सभा

राज ठाकरे यांच्या सगळ्याच सभा प्रचंड गाजतात. त्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सभा घेतली होती. या सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग्याचा आवाजाचे प्रकरण छेडले होते. त्यानंतर, मे महिन्यात त्यांनी शेवटची सभा औरंगाबदेत घेतली. या सभेतही त्यांनी तत्कालीन सरकारला भोंग्याविरोधात अल्टिमेटम दिला होता. त्या सभेनंतर राज ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर ते फार कमी वेळा अॅक्टिव्ह दिसले. आज पुन्हा ते कार्यकर्त्यांसाठी सभा घेणार असून या सभेतून ते पक्षाच्या वाढीसाठी नवी दिशा देऊ शकतील.