घरताज्या घडामोडीसणांवरुन राज-उद्धव आमने सामने, राज ठाकरे यांची शिवसेनेवर टीका

सणांवरुन राज-उद्धव आमने सामने, राज ठाकरे यांची शिवसेनेवर टीका

Subscribe

जुन्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या, कामे वाजवली जात आहेत

राज्य सरकारने सणांवर घातलेल्या निर्बंधावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारकडून कामे करून घेण्यासाठी जुन्या महापौर बंगल्यावर येणार्‍या बिल्डरांच्या गाड्या काही कमी झाल्या नाहीत. कामे वाजवली जात आहेत. मग सणांवरच निर्बंध का?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी झाल्या नाहीत. सरकारकडून कामे करून घेण्यासाठी येणार्‍या या गाड्या काही कामी झाल्या नाहीत. कुठेच काही गोष्टी कमी झाल्या नाहीत. मग सणांवरच का येता? असा सवाल राज यांनी केला.

सर्व सुरू, मग मंदिरच का बंद

कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का? बाहेरच्या राज्यांचं काय? जनआशीर्वाद यात्रा चालली तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आल्यावर लॉकडाऊन. सणांतून फक्त रोगराई पसरते. यात्रेतून नाही. यांच्या मेळाव्यातून आणि हाणामार्‍यातून कोरोनाची लाट पसरली नाही. यांना पाहिजे तेवढे सुरू करतात. सर्व गोष्टी सुरू आहेत. यांचे मेळावे सुरू आहेत. राणेंची यात्रा निघाली. त्यांच्यासोबत हाणामार्‍या सुरू आहेत. भास्कर जाधवच्या मुलाने अभिषेक सुरू केला. त्यांना मंदिरं सुरू. आमच्यासाठी नाही. क्रिकेट सुरू आहे. त्यामुळे सणांवरच बंधन का?, असा सवाल त्यांनी केला.

- Advertisement -

नियम सर्वांना सारखेच हवे

मंदिरं उघडली गेलीच पाहिजे. आजचा दिवस होऊ दे, माझ्या लोकांच्या बैठका घेणार आहे. मंदिरं सुरू करा नाही तर मंदिरांसमोर घंटनाद करू. नियम लावायचे तर सर्वांना समान नियम लावा. याला एक त्याला एक असे करून चालणार नाही. यांची बाहेर पडायला फाटते याला आमचा काय दोष?, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

लॉकडाऊन आवडे सरकारला

गेल्या वर्षी दहीहंडी होती; पण साजरी केली नव्हती. गेल्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पी साईनाथ यांचं पुस्तक आहे. तसं ‘लॉकडाऊन आवडे’ सरकारला असं झालं. त्यात हजारो कोटींची कामे वाजवली जात आहे. मेळावे, मोर्चे होत आहेत. यांच्या हाणामार्‍या होत आहेत. तेव्हा कोरोना होत नाही का?, असा सवालही त्यांनी केला.

- Advertisement -

स्मारकाचा विरोध जुनाच

दरम्यान, राज ठाकरे यांनी पूर्वीही महापौर बंगल्यातील ठाकरे स्मारकाला विरोध केला होता. बाळासाहेबांच्या जागेसाठी भव्य जागा निवडण्याऐवजी मुंबईच्या महापौरांचा बंगला बळकविण्याचा शिवसेनेचा डाव आहे, असं विधान करून राज ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली होती. राज ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१५मध्ये हे विधान केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आजही त्यांनी बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी झाल्या नाहीत, असं विधान करून शिवसेनेला डिवचलं आहे.

अस्वल अंगावरचे केस मोजत नाही

मनसे पदाधिकार्‍यांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्याकडे राज यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर, अस्वलाच्या अंगावर केस किती हे अस्वल मोजत नाही. आम्हीही मोजत नाही. सूडबुद्धीनेच सुरू आहे. हे विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? असा सवाल त्यांनी केला.

तो फेरीवाला आमच्याकडून मार खाईल

ठाण्यात महिला पालिका अधिकार्‍याची बोटे छाटणारा फेरीवाला पोलिसांकडून सुटेल तेव्हा तो आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. ह्यांची जेव्हा सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा त्यांना कळेल. हिंमत कशी होते यांची. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो याने काही सुधारणारे लोक नाहीत. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. सरकारी अधिकार्‍याची बोटे छाटता? आज अटक झाली आहे उद्या जामीन मिळेल. परंत दुसर्‍याची बोटं तोडायला बाहेर येतील, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -