राज ठाकरेंची २८ मे रोजी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, काय भूमिका घेणार?

raj thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  येत्या २८ मे रोजी मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. शस्त्रक्रिया पार पडण्याआधी राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. पक्षबांधणीसाठी अमित ठाकरे (Amit Thackeray) राज्यव्यापी दौरा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच येत्या १ तारखेला लिलावती रूग्णालयात (Lilavati Hospital) राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्याआधीच ते आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ही बैठक वांद्र्यातील रंगशारदा येथे होणार आहे.

१ तारखेला शस्त्रक्रिया झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या रिकव्हरीसाठी काही दिवस किंवा महिन्या भराचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ते कदाचित महिन्याभरासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांपासून दूर राहू शकतात. त्यामुळे त्यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते भोंग्याचा मुद्दा किंवा अयोध्या दौऱ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात.

अमित ठाकरे यांनी नेतेपद स्वीकारून जवळपास दोन वर्ष झाले आहेत. कोरोना काळात त्यांना राज्यव्यापी दौरा करायचा होता. परंतु कोरोना विषाणूमुळे त्यांना ते जमलं नाही. त्यामुळे आता जवळपास दोन ते अडीच वर्ष झाली आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा अमित ठाकरे करणार असून हा दौरा मनसे पक्षासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह हे सातत्याने राज ठाकरेंना आव्हान देत आहेत. परंतु आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सिंह यांना आव्हान देण्यात आलं आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत हा इशारा दिला आहे. बृजभूषण सिंह याने महाराष्ट्राच्या मातीवर पाऊल ठेवून दाखवावे, त्याच्या तंगड्या तोडून हातात दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी सिंहांना दिला आहे.


हेही वाचा : “ब्रिज”चे निर्माते म्हणत मनसेकडून पवार आणि बृजभूषण सिंहांचा फोटो ट्विट, राज ठाकरेंच्या दौऱ्याविरोधात रसद पुरवल्याचा आरोप