मुंबई : आज महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यानिमित्त राज्यात अनेक नेत्यांचे सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज लालबागमध्ये मेघवाडी येथे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी शेवटची प्रचार सभा पार पडली. यासभेत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले आहेत. (MNS Chief Raj Thackeray speech at lalbaug.)
हेही वाचा : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी जयंत पाटलांना काय सुनावलं, रायगडमधील राजकारणाला नवा ट्विस्ट ?
महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न रखडलेले आहेत. महाराष्ट्रात अनेक लोकांना भेटलो. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्राची झाली आहे. गाडी चालवायला रस्ते मिळत नाही, तर चालायला फुटपाथ मिळत नाही. हॉस्पिटमध्ये बेड मिळत नाही, रोजगार नाही. ग्रामीण महाराष्ट्रातील मुले शहरात येतात, तर मुंबई-पुण्यातील मुले परदेशात जाण्याचा विचार करतात. अनेक विषय आहेत, ज्याची सोडवणूक झालेली नाही” असे राज ठाकरे म्हणाले आहेत. या सर्व गोष्टी पूर्ण होत नसल्यामुळे तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी किंवा वळावे यासाठी काही गोष्टींची सोय केली आहे. महाराष्ट्र हा हिंदुत्वाने भारावलेले राज्य आहे. पण हिंदुत्वाने भारावलेल्या महाराष्ट्रात हे हिंदुत्व तोडण्याचे काम शरद पवारांनी केले असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
आज राज्याची परिस्थिती पाहिली तर राज्यात जाती जातींमध्ये भेदभाव केले जात आहे, असे ते म्हणाले आहेत. तसेच शिवसेना, मनसे, काँग्रेस, एनसीपी, भाजपा हे राजकीय पक्ष मेले तरी चालतील, पण महाराष्ट्र जगला पाहिजे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जे राजकारण चालते, तसे महाराष्ट्रात होऊ नये. अत्यंत भीषण परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर हे सर्व सुरु झाल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच महाराष्ट्राला संतांनी एकोप्याची शिकवण दिली. यांच्या स्वार्थी राजकारणासाठी आपण सगळे विसरतोय का?” असेही ते म्हणाले आहेत.
Edited By Komal Pawar Govalkar