रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला येत्या काही दिवसांमध्ये कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा नवीव वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे रत्नागिरीतील नेते राजन साळवी हे भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर जाऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे कितपत सत्य आहे आणि राजन साळवी खरंच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार आहेत का? याबाबत त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज गुरुवारी (ता. 02 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ते नाराज नसल्याचे सांगितले, पण पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भविष्यात मार्गक्रमण करणार असल्याचेही राजन साळवी यांनी सांगितले आहे. (Rajan Salvi explained his position on discussions about leaving the Thackeray group)
रत्नागिरी विधानसभेचे ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांना महाराष्ट्रा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी राजापूर विधानसभेते सलग तीनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. पण यंदा मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठांनी दखल घेतली नसल्याने राजन साळवी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे याबाबत आता स्वतः राजन साळवी यांच्याकडूनच स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रसार माध्यमांसमोर राजन साळवी म्हणाले की, ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. पण 2024 च्या पराभावाला आम्हाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्या पराभवाचे दुःख, खंत आणि वेदना माझ्यासकट माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्यतही शिवसेना मार्गक्रमण करत आहे.
तसेच, मला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून समजत आहे की, मी नाराज आहे. मी भाजपाच्या, शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसे काहीही नाही. माझे माझ्या मतदारसंघातील कार्यपद्धतीवर मार्गक्रमण सुरू आहे. त्यामुळे मी नाराज असल्याच्या किंवा अशा तऱ्हेच्या बातम्या या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार आहे. त्याबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही, असे ठाकरे गटाचे कोकणातील नेते राजन साळवी यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तर भाजपाकडून काही ऑफर आहे का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, पिकल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतंच ना… असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तर भाजपाकडून कोणीही संपर्क केला नसल्याचा खुलासाही यावेळी राजन साळवी यांनी केला आहे.
तर, शिवसेना शिंदे गटाचे आबिटकर म्हणाले होते की, राजन साळवी येणार असतील, तर स्वागत आहे. यावर साळवी म्हणाले की, पक्षात येणाऱ्या प्रत्येक माणसाचे स्वागत करण्याची भावना असते. मी मतदारसंघात संघटन कौशल्याने काम केले आहे. त्या भावनेने ते बोलत असतील, असे साळवी यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच, उद्धव ठाकरे गटातील निवडून आलेले आमदार, माजी आमदार शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहे, असे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे, या प्रश्नावर उत्तर देत राजन साळवी म्हणाले की, ते त्यांचे व्यक्तीगत मत असेल. मी माझ्या भावना सांगितल्या आहेत. माझ्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत. मी माझ्या मतदारसंघात रोजच्या पद्धतीने काम करत आहे.