राजस्थानमधील कोटा येथे रविवारी नीटची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटना अवघ्या पाच तासांत घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. यानंतर यावर्षी कोटामध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 22 झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये लातूरमधील एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. या विद्यार्थ्याने परीक्षा दिल्यानंतर कोचिंग इन्सिट्यूटचा इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जिल्हाधिकाऱ्यांनी कोचिंग इन्स्टिट्यूटला रविवारी परीक्षा न घेण्याच्या सूचना केल्या होत्या, असं असतानाही परीक्षा घेतल्या जात असल्याचं समोर आलं आहे. (Rajasthan Two students commit suicide in Kota within five hours A student of Latur ended Avishkar Kasale )
लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील अविष्कार संभाजी कासले (17वर्षे) हा विद्यार्थी कोटा येथे शिक्षण घेत होता. रविवारी अविष्कारने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अविष्कारचे आई वडील हे दोघेही शिक्षक आहेत. अहमदपूरमध्ये ते राहतात. त्यांचा मोठा मुलगा आयआयटी हैदराबाद येथे शिक्षण घेतो. मोठ्या मुलाचं कोटामधून शिक्षण पूर्ण झालं होतं. त्याचं यश बघून अविष्कारलाही कोटा येथे शिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं. नेमकं या आत्महत्ये मागची काय कारण आहेत ती समोर आलेली नाहीत. अविष्कारने दुपारी 3.15 च्या सुमारास जवाहनगरच्या कोचिंग क्लासच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
पेपर देऊन संपवलं आयुष्य
कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्याने वर्गात बसूनच परीक्षा दिली होती. परीक्षा संपताच तो बाहेर आला आणि बाल्कनीतून खाली उडी मारली. तो सहाव्या मजल्यावरून सुमारे 70 फूट खाली पडला. त्याच्या डोक्याला आणि डोळ्यांना तसंच, शरिरावर गंभीर जखमा झाल्या. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थशळी पोहोचून पाहणी केली. मृतदेह एमबीएस रुग्णालयाच्या शवगारात ठेवण्यात आला आहे. सध्या अविष्कारच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न केल जात आहे.
बिहारच्या रोहतास जिल्ह्यात राहणारा आदर्श राज गेल्या एक वर्षापासून कोटा येथील कोचिंग सेंटरमध्ये परीक्षेची तयारी करत होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या बहिणीसह तो कोटा येथे एका घरात राहत होता. पाच तासांच्या अंतरांनी दोन्ही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.
(हेही वाचा: छगन भुजबळांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले; “राजकीय भूमिका मांडताना…”, )