बाप जैसा बेटा.., ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाची खैरेंवर टीका

Chandrakant Khaire,

ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक ऋषिकेश खैरे हे एका ऑडिओ क्लिप प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली आहे. महाविकास आघाडी सरकार काळात बदलीसाठी ऋषिकेश यांना दिलेले दोन लाख रुपये परत मागताना दिसून येत आहे. बदलीचं काम झालं नाही म्हणून मला माझे पैसे परत करा, असा तगादा हा व्यक्ती लावताना दिसतोय. त्यावर ऋषिकेश खैरे पैसे देण्यासाठी टाळाटाळ करताना दिसून येत आहेत. दरम्यान या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाने चंद्रकात खैरेंवर टीका केली आहे.

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी फेसबुक ट्वीट करत चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाप जैसा बेटा,भरलो जल्दी लोटा….! एखाद्या कार्यकर्त्यांनी जर चार चाकी वाहन घेतले किंवा चांगले मोठे घर घेतलं तर त्याच्याकडे संशयाने पाहणारे चंद्रकांत खैरे आता यावर काय उत्तर देतील?, असा प्रश्न राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थित केला आहे.

यावरून एक गोष्ट लक्षात आली. जे आडात आहे तेच पोहऱ्यात आले. युवा सैनिक घडवण्याची जबाबदारी असणारा पदाधिकारी खऱ्या अर्थाने युवकांना काय आदर्श देणार हा एक चर्चेचा विषय ठरतो, असं राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलं आहे.

ऋषिकेश खैरेंची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता चंद्रकांत खैरे सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यावर ऋषिकेश खैरेंनी एका खासगी वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऋषिकेश खैरे म्हणाले की, कोरोना सुरू होण्याआधी माझा एक मित्र त्याच्या पत्नीच्या बदलीसाठी आला होता. त्यावेळी ठाकरे सरकार असल्यानं बदली करून देऊ असं मी सांगितलं होतं. पण अचानक कोरोना आला आणि त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडल्याने बदलीचे काम होऊ शकले नाही. पण त्याचे जे काही पैसे असतील ते मी परत करायला तयार आहे, असं ऋषिकेश खैरे म्हणाले. बदलीसाठी पैसे घेतल्याचं स्वतः ऋषिकेश खैरेंनी मान्य केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदलीसाठी पैसे घेतल्याचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

महाविकास आघाडीच्या काळात पैसे देऊन बदल्या केल्या जात होत्या का? हा सवाल ऋषिकेश खैरेंना केला असता यावर त्यांनी भाष्य केले नाही. खैरे यांच्या चिरंजीवाच्या या व्हायरल ऑडिओमुळे चंद्रकांत खैरेंसोबत महाविकास आघाडी सुद्धा अडचणीत येणार असल्याचं चिन्ह दिसत आहे.


हेही वाचा : मविआ सरकारमध्ये पैसे घेऊन बदल्या? चंद्रकांत खैरेंच्या मुलाच्या कथित ‘ऑडिओ बॉम्ब’ने