आमच्या देवाला मंदिरातून बाहेर काढलं गेलंय, क्षीरसागरांनी ठाकरेंबाबत व्यक्त केल्या भावना

Rajesh Kshirsagar

विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. १६४ मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. दरम्यान, विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर बंडखोर नेत्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्वव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मातोश्री हे आमचं मंदिर आहे. आमचा देव मंदिरात होता, तेच योग्य होतं, त्याला बाहेर काढलं गेलंय, अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्वव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेना आणि भाजप वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मातोश्री आमचं मंदिर असून एकनाथ शिंदे हे संकटमोचक आहेत, असं क्षीरसागर म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना २०१६ ते २०१७ पासून युवा सेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून दाखवलं गेलं. पण, आमचा देव मंदिरात होता, तेच योग्य होतं. त्याला बाहेर काढलं गेलं. पण, दर १० ते १५ वर्षांनी शिवसेनेमध्ये अशी परिस्थिती येते, ती कशामुळे येते, याचा विचार व्हावा. परंतु राज्यातील शिवसैनिकांना गद्दार म्हणता येणार नाही, असंही क्षीरसागर म्हणाले.

दरम्यान, राज्यातील विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर सर्व आमदार आता आपल्या मतदार संघात रवाना झाले आहेत. तसेच त्यांना बंडोखोरी केली नसून त्यांना अन्यायाविरोधात लढा दिल्याचं, सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा काल मुंबई आणि ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. तसेच बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा : बाहेरून या सरकारला मदत करण्याची माझी मानसिकता, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा