घरCORONA UPDATE१४०० तबलिगींपैकी फक्त ५० पॉझिटिव्ह; आरोग्यमंत्र्यांची माहिती!

१४०० तबलिगींपैकी फक्त ५० पॉझिटिव्ह; आरोग्यमंत्र्यांची माहिती!

Subscribe

राजधानी दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगी जमातीच्या मरकजमध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या १४०० तबलिगींपैकी ५० तबलिगींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून इतरांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरून उठत असलेली राळ आता शमेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळी व्हिडिओ लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी साधलेल्या संवादातून ही माहिती समोर आली आहे. मरकजला महाराष्ट्रातून एकूण १४०० तबलिगी सहभागी झाले होते याची आकडेवारी दिल्ली सरकारकडून सादर झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांचा शोध घेऊन या सर्व १४०० तबलिगींना क्वॉरंटाईन केलं होतं. त्यांची चाचणी करण्यात आल्यानंतर त्यातल्या फक्त ५० तबलिगींना कोरोना झाल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे.

राज्यात ५१ हजार चाचण्या, २४ हजार मुंबईत!

दरम्यान, राज्यभरात मोठ्या संख्येने चाचण्या होत असून आत्तापर्यंत देशभरात जितक्या चाचण्या झाल्या आहेत, त्यातल्या २० टक्के म्हणजेच तब्बल ५१ हजार चाचण्या महाराष्ट्रात झाल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच, या ५१ हजारांपैकी सुमार ५० टक्के म्हणजेच २४ हजार चाचण्या एकट्या मुंबईत झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. चाचण्या करण्याची क्षमता अजून वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून सध्या महाराष्ट्रात १५ खासगी आणि १५ सरकारी अशा एकूण ३० लॅब्जमध्ये कोरोना नमुन्यांच्या चाचण्या होत आहेत. त्यात आता ६ सरकारी लॅब्जची देखील भर पडली असल्याचं टोपे म्हणाले.

- Advertisement -

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं ऑडिट होणार!

याशिवाय, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठीच्या सरकारच्या उपाययोजनांची देखील माहिती दिली. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं ऑडिट केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ. अविनाश सुपे यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याशिवाय, राज्यभरातल्या कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तज्ज्ञ सल्ला देण्यासाठी ७ सदस्यांच्या समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे. मधुमेह, अस्थमा, ह्रदयरोग किंवा फुफ्फुसांचे आजार अशा समस्यांमुळे त्रस्त असणाऱ्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे. एकूण मृतांमध्ये ८० टक्के रुग्ण हे यापैकी कुठल्या ना कुठल्या आजाराने त्रस्त होते. त्यामुळे या आजारांनी त्रस्त असलेल्या कोरोनाग्रस्तांना कशा प्रकारे उपचार दिले जावेत, याबाबतचा सल्ला देण्याचं काम ही ७ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम करेल, असं देखील राजेश टोपेंनी यावेळी नमूद केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -