तिसर्‍या लाटेचे संकट दिवाळीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

state health minister rajesh tope

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे संकट अजून सरलेले नाही. दिवाळीनंतर ही लाट राज्यात येईल, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिला. आजची परिस्थिती पाहता आपण सजग राहिले पाहिजे. प्रभाव कमी असला तरी संकट टळलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शाळा आणि सिनेमागृह सुरू करण्यात आली आहेत. मात्र, अजूनही कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिंता आहे. ही लाट ऑक्टोबरनंतर वा दिवाळीनंतर येण्याची शक्यता असल्याचे टोपे म्हणाले. पण, आजची परिस्थिती पाहता ती तितकी प्रभावी नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील कोरोनाची परिस्थिती, लसीकरण आणि राजकीय घडामोडींवर टोपे यांनी जालना येथे भाष्य केले. ‘टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी राज्यात सुरू असलेल्या लसीकरणामुळे तिचा प्रभाव जाणवणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली; पण तिचा प्रभाव जास्त दिसून आला नाही. लसीकरणामुळे कोरोनाची दाहकता कमी करता येऊ शकते, असेही ते म्हणाले. राज्यातील कोरोना स्थितीबाबत बोलताना त्यांनी राज्यात परिस्थिती आटोक्यात असली तरी परभणी जिल्ह्यात एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याने शाळा १० दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाला आरोग्य विभागाने काही सूचना केल्या असून, आणखी अशी घटना घडल्यास शालेय शिक्षण आणि विभाग त्या सुचनेनुसार निर्णय घेईल, असेही टोपे म्हणाले.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असली तरी तिथे काळजी करण्याची आवश्यकता नाही. तिथे लसीकरण वाढवण्यासोबतच कोरोना टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने ‘मिशन कवचकुंडल’अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत राज्यात दररोज १५ लाख जणांना लसीकरण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.