कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल, राजेश टोपेंचा इशारा

देशात कोरोना रूग्णसंख्येच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रूग्णसंख्या वाढत असल्याने आढावा बैठक घेत संबंधित राज्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. राज्यात सध्या चिंता करण्यासारखी परिस्थिती नाहीये. परंतु रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त राजेश टोपे यांच्या हस्ते जालन्यात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

सर्व वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार असून केंद्राकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन केलं जाईल आणि आरोग्य विभागाला तशा सूचना केल्या जातील. मात्र नागरिकांनी मास्क वापरावा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याची मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मास्क वापरण्यासाठी पुन्हा सांगायचं का यावरही चर्चा झाली. सध्या लोकांना आवाहन केलं असून ऐच्छिकच ठेवलं आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपली जबाबदारी ओळखून काम करण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी असून रुग्णसंख्येच्या बाबतीत राज्य आठव्या क्रमांकावर आहे. राज्यात चांगल्या पद्धतीने झालेल्या लसीकरणाचा हा परिणाम आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगरच्या पोलीस संचलन मैदानात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त ध्वजवंदन आणि संचलन समारंभ पार पडला. यावेळी या कार्यक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, आपण सर्वांनी शर्थीने या संकटावर मात केली. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी अजून ते संपले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध जरी हटवले असले तरी सर्वांनी स्वच्छेने मास्क वापरला पाहिजे. आता कुठेलही निर्बंध नाहीयेत, मात्र राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली आणि टास्क फोर्सने सूचना केली तर निर्बंध लागू शकतात, असं अजित पवार म्हणाले.


हेही वाचा : राज ठाकरेंच्या सभेला ५ लाख लोक आले तरी फरक पडणार नाही – चंद्रकांत खैरे