घरमहाराष्ट्रगृहमंत्री कोण? टोपे, शिंगणे की वळसे पाटील?

गृहमंत्री कोण? टोपे, शिंगणे की वळसे पाटील?

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नावे गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू आहे. पण याचदरम्यान, गृहमंत्रीपदासाठी शरद पवार यांची पसंती मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच असल्याचे राजकीय वर्तृळात बोलले जात आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया या घराबाहेर सापडलेली स्फोटके असलेली स्कॉर्पियो आणि त्यानंतर गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा झालेला संशयास्पद मृत्यू. या दोन घटनांनी महाराष्ट्राचं राजकारण पुरत ढवळून निघालं आहे. दोन्ही घटनांमद्ये सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा संबंध असल्याचे समोर आल्याने मुंबई पोलिसांचीही नाचक्की झाली आहे. याचपार्श्वभूमीवर, विरोधक ठाकरे सरकारमागे हात धुऊन लागले असून भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर गेले दोन दिवस गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत असून त्यांनी शुक्रवारी शरद पवार यांची दोन तास भेट घेतली. या भेटीचा तपशील कळू शकला नसला तरी सरकारवर दबाव वाढत असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नावे गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू आहे. पण याचदरम्यान, गृहमंत्रीपदासाठी शरद पवार यांची पसंती मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच असल्याचे राजकीय वर्तृळात बोलले जात आहे. यापूर्वीही कामगारमंत्री असलेले दिलीप वळसे पाटील यांचे नावही चर्चेत होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी हे पद घेण्यास नकार दर्शवल्याचे समजते. वळसे पाटील यांच्याप्रमाणेच अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे देखील पवार यांच्या अत्यंत विश्वासातील मंत्री आहेत. त्यामुळे देशमुखांची जागा कोण घेणार याबाबत राष्ट्रवादीतच चर्चा सुरू झाली आहे.

अॅंटालिया कार प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमागे सचिन वाझेच असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात खळबळ उडवली होती. त्यानंतर फडणवीस रोजच याप्रकरणी नवीन नवीन खुलासे करत होते. यात वाझे हे प्यादे असून खरा सूत्रधार वेगळाच असल्याचा गौप्यस्फोट करत त्यांनी ठाकरे सरकारची झोप उडवली. तसेच मुंबई पोलिसांच्या तपासावरच बोट ठेवत विरोधकांनी हा तपास एनआयएकडे देण्यात यावा अशी मागणीही लावून धरली. त्यानंतर वाझेंना एनआयएने अटक केली असून राज्य सरकारला नाईलाजाने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचीही उचलबांगडी करावी लागली आहे. यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही पद जाण्याची शक्यता आहे. गृहमंत्री म्हणून देशमुख यांचे गृहखात्यावर नियंत्रण नव्हते. मुंबई-पुणे पोलीस आयुक्तालयात होणाऱ्या घटनांचे ब्रिफींगही आयुक्तालयाकडून त्य़ांना करण्यात येत नव्हते. आयपीएस लॉबी सो़डाच पण महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही त्यांचे नियंत्रण नसल्याची कुजबुज गृहखात्यातच आहे. याचा कानोसा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच घेतला होता. गृहखात्यावरून राष्ट्रवादीची बरीच नामुष्की होत असल्याने देशमुख यांना पायउतार होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

देशमुख यांच्यानंतर गृहमंत्रीपदावर कोण बसणार याची आता चर्चा सुरू आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीनुसार गृहमंत्रीपदासाठी सक्षम व खमक्या नेतृत्वाची गरज आहे. टोपे यांनी कोरोनाकाळात ज्या पद्धतीने आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी पार पाडली. ते पाहता गृहमंत्रीपदासाठी टोपेच योग्य असल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. यामुळे आता नवीन गृहमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -