घरदेश-विदेशराजीव सातव यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक; राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त

राजीव सातव यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक; राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त

Subscribe

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं आज रविवारी पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात निधन झालं. राजीव सातव यांच्या अकाली जाण्याने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या खूप जवळचे होते. राजीव सातव यांच्या जाण्याने काँग्रेसची आणि गांधी कुटुंबाची खूप मोठी हानी झाली आहे.

‘आम्ही आमचा हुशार सहकारी गमावला’

राहुल गांधी यांनी ट्वीट करत हळहळ व्यक्त केली. “राजीव सातव यांच्या निधनानं मला खूप दु:ख झालं आहे. ते खूप ताकदीचे नेते होते. हा आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करताना राजीव सातव यांच्या निधनावर व्यक्त होण्यासाठी शब्द नाही आहेत, असं म्हटंल आहे. “आम्ही आमचा हुशार सहकारी गमावला आहे. ते मनानं अगदी निर्मळ होते. काँग्रेस पक्षाच्या मूल्यांशी ते घनिष्ठ होते. तसंच भारताच्या जनतेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतलं होतं. माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांची पत्नी आणि मुलांसाठी मी प्रार्थना करते,” असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीव सातव यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाल्याचं म्हटलं आहे. “काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!” असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्राचं उदयोन्मुख नेतृत्व ज्यांना राज्याची राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण होती असे खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे.”

प्रतिभाशाली उमदे नेतृत्व हरपले! – अशोक चव्हाण

आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

खा. सातव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा. राजीव सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. पुढील काळात देश व काँग्रेस पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित केले जात होते.

राजीव सातव यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी मोठी हानी आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातील त्यांचा मित्र परिवार आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सातव कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

मनाला चटका देणारी घटना, युवकांचं नेतृत्त्व करणारा नेता हरपला – टोपे

माझे जवळचे मित्र राजीव सातव यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुख:द आहे. मी त्यांना भेटण्याकरिता जहांगीरच्या व्यवस्थापनेशी चर्चा केली. त्यांच्या कुटुंबाची माहिती घ्यावी, त्यांना भेटावं, यासाठी मी मुद्दाम पुण्यात आलो होतो. पण मला जेव्हा कळलं की त्यांचं निधन झालं. अतिशय दु:खद घटना आहे. त्यांच्या परिवारापुरतीच नाही, तर महाराष्ट्राला चटका देऊन जाणारी ही घटना आहे. त्यांचे आणि माझे दोन पिढ्यांचे संबंध आहेत. माझे वडील अंकुशराव टोपे आणि त्यांच्या आई रजनीताई सातव या दोघांनी एकत्र काम केलं. दोघांनी काँग्रेस पक्षाचं चांगलं नेतृत्व केलं. आम्हाला अभिमान होता की मराठवाड्यातील तरुण सहकारी देशस्तरावर राजकारण करतात आणि युवकांचं नेतृत्व देशस्तरावर करतात. आमच्या मराठवाड्याच्या खूप अपेक्षा होत्या त्यांच्याकडून पण ते खूप लवकर अलपवयात ते सोडून गेले, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच इश्वरचरणी प्रार्थना करेन, असं टोपे म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -