मुंबई : “माहिम मतदारसंघातील लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांचे त्यांना आव्हान आहे. लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार्या मनसेसमोर शिंदे गटाकडून उमेदवार उभा केला जाणार नाही अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आम्ही खूप दुखावलो गेलो असून तो राग अद्याप गेलेला नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया मनसेचे विद्यमान आमदार आणि कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी दिली आहे. (Raju Patil MNS exclusive interview with MyMahanagar criticized Shivsena Shinde group)
हेही वाचा : Raju Patil : कोविड घोटाळ्यात सर्वच बरबटलेले; प्रमोद (राजू) पाटील यांचा थेट आरोप
‘आपलं महानगर’ने मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांची विशेष मुलाखत घेतली. त्यामध्ये त्यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाबरोबरच माहिम मतदारसंघाबद्दलचे मत नोंदवले. माहिम मतदारसंघात अमित ठाकरे यांना मोठे आव्हान आहे, पण याबद्दल प्रमोद (राजू) पाटील म्हणतात की, “कोणतीच निवडणूक सोपी नसते. सहज निवडून यायचे असते किंवा विधान भवनात पाठवायचे असते तर राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवले असते, पण ते स्वत: लढावू असल्याने ते कोणाला सांगायला गेले नाहीत किंवा मागायला गेले नाहीत.”
मागील 2019 च्या निवडणुकीत वरळीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे प्रथमच रिंगणात उतरले होते. त्यावेळी ठाकरे घरातील पहिलीच व्यक्ती निवडणूक लढवत असल्याने राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता, पण यावेळी अमित ठाकरे यांच्यासमोर ठाकरे गटाचे महेश सावंत उभे आहेत. त्याबद्दल विचारले असता प्रमोद (राजू) पाटील म्हणाले की, “आपण पाडलेला पायंडा दुसरा पाळेल अशी अपेक्षा राज ठाकरे ठेवत नाहीत. आदित्य ठाकरे यांच्यासमोर उमेदवार त्यावेळी दिला नाही, पण कामाबद्दल तक्रारी आल्या म्हणून मनसेचा उमेदवार देण्याचा निर्णय झाला.”
“माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोत्या मनाचे असल्याने त्यांनी माहिममध्ये उमेदवार दिला तसेच ते देणारच होते. वस्तुत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवार द्यायला नको होता असे आमच्यासारख्यांना वाटते. त्यांनी उमेदवार दिल्याने आमच्यासारखे कार्यकर्ते दुखावले आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये माझ्याविरोधातही शिंदे गटाने उमेदवार दिला आहे. त्याबद्दल मला आणि माझ्या सहकार्यांना काहीही पडलेली नाही, पण लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यासाठी आम्ही येथे मन लावून काम केले आणि तिथे माहिममध्ये त्यांनी आमच्या राजसाहेबांच्या मुलासमोर उमेदवार दिला आहे. याने आम्ही खूप दुखावलो गेलो आहोत. तो राग अद्याप गेलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
श्रीकांत शिंदे यांना जिंकून आणले ही आमची चूक
“लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मते मागून त्यांना जिंकून आणले ही आमची चूक झाली. राज ठाकरे यांचे आदेश मानून केलेली ही मोठी चूक आहे, पण पुन्हा ही चूक होणार नाही. राज ठाकरे यांनी सांगितले तरी होणार नाही,” असे सांगून प्रमोद (राजू) पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्याबद्दलचा राग व्यक्त केला. “कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गट माझ्याविरोधात उमेदवार देणार हे माहीत होते. तिथे कदाचित मनसेचा दुसरा उमेदवार असता तर शिंदे गटाने कोणाला तिकीट दिले नसते, पण मी आहे म्हणून उमेदवार दिला. लोकसभेत मदत केल्यानंतरही उमेदवार रिंगणात उतरवणे हा त्यांच्या तत्त्वाचा विषय आहे. मी कोणत्याही अपेक्षेने मदत केली नव्हती. मी राज ठाकरेंच्या आदेशानुसार मदत केली होती. त्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही,” असेही ते म्हणाले.