मनसेकडून आदित्य ठाकरेंच्या वर्मावर बोट, आजोळचा उल्लेख करत थेट आव्हान

Raju Patil Tweet on Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचं आजोळ डोंबिवलीत असूनही त्या शहराची दुर्दशा का असा सवाल करत बाळासाहेबांच्या विचारांसोबत जो नडला त्याला फोडला ही हिंमतही आमच्यात आहे, असं थेट आव्हानच त्यांनी केलं आहे.

Raju Patil MNS
राजू पाटील मनसे आमदार

Raju Patil Tweet on Aditya Thackeray | डोंबिवली – गेल्या २५ वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. यावरूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंचं आजोळ डोंबिवलीत असूनही त्या शहराची दुर्दशा का असा सवाल करत बाळासाहेबांच्या विचारांसोबत जो नडला त्याला फोडला ही हिंमतही आमच्यात आहे, असं थेट आव्हानच त्यांनी केलं आहे.

हेही वाचा – वरळीत गल्लीगल्लीत फिरायला लावणार, पण विजय माझाच होणार – आदित्य ठाकरे

राजू पाटील यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंच्या वर्मावरच थेट बोट ठेवलं आहे. ट्वीट करत राजू पाटील म्हणाले की, “२५ वर्ष आपलीच सत्ता असणाऱ्या आजोळची(डोंबिवली) दुर्दशा कधी पाहिली? कुठलंही काम न करता % वारी व करून दाखवलं बाता, हाच ‘गोठलेल्यांचा’ स्वभाव. त्यामुळे ‘शिल्लकांनी’ नको तिथे बोटं खुपसू नयेत. नाहीतर बाळासाहेबांच्या विचारांसोबत जो नडला त्याला फोडला ही हिंमतही आमच्यात आहे.

गेल्यावर्षी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी मनसेचा उल्लेख संपलेला पक्ष असा केला होता. तेव्हापासून मनसेने आदित्य ठाकरेंवर लक्ष्य केलं होतं. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर मनसेनेही शिवसेनेचा उल्लेख शिल्लकसेना असा केला होता. त्यावरूनच राजू पाटील यांनी आज आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.

राजू पाटील हे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या हद्दीत कल्याण डोंबिवली महापालिका येते. गेल्या अनेक वर्षांपासून येथे रस्त्यांसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांबाबत राजू पाटील सातत्याने आग्रही भूमिका घेताना दिसतात. त्यामुळेच त्यांनी आज डोंबिवलीतील दुर्दशेचा मुद्दा अधोरेखित करत आदित्य ठाकरेंना आणि पर्यायाने शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे.