फडणवीस सरकारने गुंठ्याला ९५० रुपये मदत दिली, आताच्या सरकारने फक्त १३५ रुपये – राजू शेट्टी

Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetty

राज्य सरकारने राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर झाला असून यावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात गुंठ्याला ९५० रुपये मदत मिळाली होती. आताच्या सरकारने केवळ १३५ रुपये दिली, असं राजू शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मदत मिळालली नसल्याचं देखील राजू शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति गुंठा मिळालेली मदत सांगताना फडणवीस सरकार आणि ठाकरे सरकारमधील फरक स्पष्टपणे सांगितला आहे. २०१९ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी मी केली होती. तो निर्णय योग्य होता. फडणवीस यांनी तो निर्णय घेतला म्हणून मी तो चुकीचा म्हणणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. फडणवीस सरकारच्या काळात पूरग्रस्तांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला होता. आताही तसाच निर्णय घ्यायला हवा होता. उद्धव ठाकरेंनी स्वत: ट्विट केलं होत, मला बैठकीत आश्वासनही दिलं होतं. २०१९ च्या शासन निर्णयप्रमाणेच मदत मिळेल. पण, २ महिन्यांपूर्वी मी जो मुद्दा उपस्थित केला होता, तसंच घडलं. गुंठ्याला १३५ रुपयांप्रमाणे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले. जे २०१९ च्या निर्णयानुसार त्यावेळेसच्या सरकारने गुंठ्याला ९५० रुपये दिले होते. त्यामुळे, जे बरोबर आहे त्याला मी बरोबरच म्हणणार, जे चुकीचं आहे, त्याला मी चूकच म्हणणार.