कोरोनाला हरवल्यानंतर राजू शेट्टी पुन्हा रुग्णालयात दाखल!

Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetty

सप्टेंबर महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यासाठी रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी रीतसर उपचार देखील घेतले होते. कोरोनाला हरवून ते घरी देखील परतले होते. मात्र, आता पुन्हा एकदा राजू शेट्टींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब अचानक वाढल्यामुळे त्यांना उपचारांसाठी दाखल केल्याची माहिती मिळत आहे. तसेच, त्यांची प्रकृती स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि निकटवर्तीयांनी काळजी करू नये, असं आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टी गेल्या महिन्याभरापासून राज्यभर दौरे करत होते. त्याचाच ताण आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर दौरे

ऊसदर आंदोलन, साखर कारखानदारांची अरेरावी, कायम नाडला जाणारा शेतकरी, बाजार समित्यांमध्ये होणारं शेतकऱ्याचं नुकसान या मुद्द्यांवर राजू शेट्टी यांनी वारंवार आवाज उठवला आहे. गेल्या महिन्याभरात या मुद्द्यांवरून त्यांनी राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यानुसार त्यांच्या मागण्या देखील त्यांनी सरकार दरबारी मांडल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी ते दिल्लीला शेतकऱ्यांच्या आंदोलनात देखील सहभागी झाले होते. दरम्यान, आज सकाळी ते पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडणार होते. मात्र, त्याआधीच त्यांना त्रास सुरू झाल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ते दाखल झाल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.