मुंबई : राजू शेट्टी माझा सल्लाच ऐकत नाही. अन्यथा ते खासदार झाले असते. शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा राजू शेट्टी यांना लोकसभेत मांडता आला असता, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी, ‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझे काय खरे नाही,’ असे विधान जयंत पाटील यांनी केले होते. यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचवल्या.
व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार दिलीप सोपल, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नेते, सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार सचिन अहीर, आमदार कैलास पाटील, आमदार राजेश विटेकर आणि शेतकरी उपस्थित होते.
शेट्टी हाती घेतलेला झेंडा सोडत नाहीत
जयंत पाटील म्हणाले, “राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला, तर तो कधी सोडलेला नाही.”
गोड बोलून राहायला पाहिजे
त्यावर राजू शेट्टींनी म्हटले, “मग तुम्ही गोड बोलून राहायला पाहिजे…”
टाईम टू टाईम बदलत असतो
त्यानंतर जयंत पाटील म्हणाले, “माझी गॅरंटी घेऊ नका. माझे काय खरे नाही. तुम्हाला माझ्याबद्दल शंका आहे. त्यामुळे तुम्हाला हमी देणे धोक्याचे आहे. शेट्टींना 100 वेळा सांगत होतो, आघाडीकडून उभे राहावा. बंटी पाटलांमार्फत ( सतेज पाटील ) शेट्टींना 100 वेळा निरोप दिले होते. निरोप देऊन-देऊन दमलो. म्हणालेलो, आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे. तुम्ही आमच्याकडून उभे राहावा. टाईम टू टाईम बदलत असतो.”
विषय भलतीकडे जाईल
यावेळी राजू शेट्टींनी म्हटले, “मी खरे बोललो, तर विषय भलतीकडे जाईल.”
शेट्टी माझा सल्लाच ऐकत नाहीत
जयंत पाटील लागलीच म्हणाले, “तुम्ही खरे बोलला, तर मलाही खरे बोलता येईल. एकाकडेच खरे आहे, असं नाही. राजू शेट्टी खासदार झाले असते, तर लोकसभेत भाषण केले असते. शेट्टी माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे.”