कोणत्याच पक्षांशी युती करणार नाही, स्वबळावर निवडणुका लढणार; राजू शेट्टींचा इशारा

Raju Shetty

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर कोणत्याच पक्षाशी युती करणार नसल्याचं देखील राजू शेट्टींनी सांगितलं आहे.

एका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी माळशिरस येथे आले होते. यावेळी त्यांनी येथील कार्यकर्त्यांसोबत तासभर चर्चा केली. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. कोणतेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही. बळीराजाला नागवले जात आहे अशी खंत शेट्टींनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारची स्थिती पाहिली तर सध्याच्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची लोकशाही राहिलेली नाही. त्यामुळे त्याच्या वेदना आम्हाला होतात. मी येत्या निवडणुकांत कोणत्याच पक्षांशी युती करणार नाही. स्वबळावर निवडणूका लढणार. तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपशी कधीच युती करणार नाही, असं देखील राजू शेट्टी म्हणाले.

दरम्यान, राजू शेट्टी यांच्या इशाऱ्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याबाबत विडाच उचलला होता – राजेश क्षीरसागर