राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस वाढली, काँग्रेस, भाजप आणि सेनेच्या बैठकांवर बैठका, काय होणार?

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा 6 जूनला अपक्ष आमदारांची बैठक घेणार आहेत. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, नरेंद्र भोंडेकर, आशिष जयस्वाल, मंजुषा गावित आणि गीता जैन अशा दहा अपक्ष आमदारांशी मुख्यमंत्री बोलणार आहेत.

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी सर्वच पक्षांनी उमेदवार दिले आहेत. पण भाजपनं शिवसेनेचे नेते संजय पवार यांच्या विरोधात कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिल्यानं या निवडणुकीला जोरदार रंगत आली आहे. त्यामुळेच आता काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. विशेष म्हणजे आज 3 वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपणार आहे.

काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी काही निवडक नेत्यांना घेऊन त्यांच्या बंगल्यावर बैठक घेतली आहे. दुसरीकडे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानेही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना प्रस्ताव दिलाय. त्या शिष्टमंडळात महाविकास आघाडीकडून अनिल देसाई, छगन भुजबळ, सुनील केदार उपस्थित होते. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस होते. पण राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीसांना दिलेला तो प्रस्ताव फेटाळून लावलाय. त्यानंतर आता भाजप नेत्यांची सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली. ती बैठकही दीड तास चालली, पण त्या बैठकीत नेमकं काय ठरलं हे अद्याप समोर आलेलं नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा 6 जूनला अपक्ष आमदारांची बैठक घेणार आहेत. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, नरेंद्र भोंडेकर, आशिष जयस्वाल, मंजुषा गावित आणि गीता जैन अशा दहा अपक्ष आमदारांशी मुख्यमंत्री बोलणार आहेत. राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी 42 आमदारांच्या मतांची गरज आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडे 30 जवळपास आमदार आहेत. त्यामुळे 13 अपक्ष आमदारांची मतं निर्णायक ठरणार आहेत.

दुसरीकडे राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. 10 जूनला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. परंतु राज्यसभेच्या 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून प्रत्येकी 1 तर शिवसेनेकडून 2 आणि भाजपकडून 3 उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या जागेसाठी चुरस होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी अधिकची मते शिवसेनेला द्यावीत, असे आदेशही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.


हेही वाचाः राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करा, मविआचा देवेंद्र फडणवीसांना प्रस्ताव