भाजपची ब्लू प्रिंट तयार, संजय पवार यांचा पराभव होणार, आशिष शेलारांचा इशारा

राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडे शिवसेनेपेक्षा जास्त मते असूनही शिवसेनेने ही निवडणूक लादली आहे. जे रोज सकाळी उठून घोडेबाजार, घोडेबाजार असा आरोप करतात, ते तबेल्यात राहतात, अशी टीका आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

Ashish Shelar said that MNS supported BJP in Rajya Sabha elections

भाजपने राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात धनंजय महाडिक यांच्या रूपाने तिसरा उमेदवार उतरवल्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. राज्यसभेच्या 6 जागांवर 7 उमेदवार उभे राहिल्याने पेच निर्माण झाला आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तसेच भाजपकडूनही अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून रणनीती आखली जात आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी अपक्ष आमदारांची वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली असून भाजपने रविवारी सायंकाळी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि महाराष्ट्र प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

या बैठकीला विरोधी पक्षनेते कोरोना होऊनदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. सोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार या चौघांमध्ये ही विशेष बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्यसभा निवडणुकीचा सर्व आढावा, व्यवस्था, रणनीती आणि कार्यपद्धती याविषयीची भाजपची ब्लू प्रिंट तयार आहे. भाजपचा तिसरा उमेदवार म्हणजे धनंजय महाडिक जिंकून येणार. म्हणजेच शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव होणार, अशा शब्दांत अ‍ॅड. आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, या निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याची टीका शिवसेनेसह काही पक्ष सातत्याने करीत आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडे शिवसेनेपेक्षा जास्त मते असूनही शिवसेनेने ही निवडणूक लादली आहे. जे रोज सकाळी उठून घोडेबाजार, घोडेबाजार असा आरोप करतात, ते तबेल्यात राहतात, अशी टीका आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून काही अपक्ष आमदारांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला होता. त्यावर राऊत यांचे हे विधान पोरकटपणाचे, बालिश आणि मुद्दामहून वेडसरपणाचे असल्याचे आशिष शेलार म्हणाले. कारण केंद्रीय तपास यंत्रणांकडून दबाव टाकण्यात येत असल्याचे त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. पराभव समोर दिसत असल्यानेच ते आतापासूनच त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

अपक्षांच्या मतांसाठी गाठीभेटी

दोन्ही पक्षांकडून आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर रविवारी ठाकूरांच्या भेटीसाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ विरारमध्ये दाखल झाले. या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आणि खासदार राजन विचारे यांचा समावेश होता. या चर्चेनंतर बविआचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील हे तीन आमदार भाजपला मदत करणार की शिवसेनेला हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


हेही वाचा : …तर निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा