घरमहाराष्ट्रRajya Sabha : निवडणूक बिनविरोध होणार? महायुती-महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर

Rajya Sabha : निवडणूक बिनविरोध होणार? महायुती-महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर

Subscribe

मुंबई : येत्या 27 फेब्रुवारीला होऊ घेतलेल्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, काँग्रेसने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आज अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. त्यात अजित पवार गटाचा राज्यसभेचे विद्यमान सदस्य प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय आश्चर्यकारक ठरला. भाजपने तीन उमेदवार दिल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज, गुरुवारची शेवटची मुदत आहे. मात्र, भाजपचे धक्कातंत्र लक्षात घेता शेवटच्या क्षणी चौथा उमेदवार देऊन भाजप काँग्रेसची चिंता वाढवू शकतो. (Rajya Sabha Will the election be uncontested Candidates announced by Mahayuti Mahavikas Aghadi​)

राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार ठरविण्यासाठी अजित पवार गटाची बैठक मंगळवारी झाली होती. या बैठकीनंतर पार्थ पवार, बाबा सिद्दीकी, अविनाश आदिक यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीची घोषणा केली. पटेल हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. ते गुरुवारी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन उमेदवारी अर्ज भरतील, अशी माहिती तटकरे यांनी दिली. प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाने अजित पवार गटातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : राज्यसभेची यादी पाहिल्यानंतर कीव येते; नाना पटोलेंचा महायुतीवर निशाणा

प्रफुल्ल पटेल हे जून 2022 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत निवडून गेले होते. त्यामुळे  जवळपास साडेचार वर्ष म्हणजे 2028 मध्ये पटेल यांची उमेदवारी संपत असताना पुन्हा त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय आश्चर्यकारक ठरला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कारवाई व्हावी म्हणून राज्यसभेचे सभापती, निवडणूक अयोग आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय बाजूने आला असला तरी न्यायालयाचा निर्णय विरोधात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन अजित पवार गटाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे पटेल यांच्या राजीनाम्यानंतर जून 2022 च्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत अजित पवार पुन्हा आपला उमेदवार उभा करू शकतात.

- Advertisement -

भाजपने अपेक्षेप्रमाणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभेसाठी नवे चेहरे देताना भाजपने नारायण राणे, प्रकाश जावडेकर यासारख्या ज्येष्ठांना तूर्त उमेदवारी नाकारली आहे. तर काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics : अशोक चव्हाणांनंतर देशमुख बंधू भाजपाच्या वाटेवर?

अशोक चव्हाण यांनी  काँग्रेसला रामराम ठोकून मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून भाजपने राज्यसभा उमेदवारांची यादी लांबवली होती. यादी लांबल्याने चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवले जाईल हे जवळपास निश्चित झाले होते. त्यानुसार भाजपने अशोक चव्हाण यांना पहिल्या क्रमांकाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपने कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊन भाजपने कुलकर्णी यांची नाराजी ओढवून घेतली. गेली साडेचार वर्ष राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.  भाजपने तिसरा उमेदवार म्हणून नांदेड जिल्ह्यातील डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. गोपछडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले  जातात. भाजपच्या डॉक्टर आघाडीचे काम करणाऱ्या डॉ. गोपछडे यांना भाजपने 2020 च्या मे-जून विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली होती. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली होती.

जून 2022 च्या विधान परिषद निवडणुकीत पराभूत झालेले माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना कॉंग्रेसने राज्यसभेसाठी संधी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हांडोरेंच्या निमित्ताने दलित चेहरा देऊन काँग्रेसने दलित समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. जून 2022 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत हंडोरे यांचा पराभव झाला होता. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव काँग्रेस श्रेष्ठींच्या जिव्हारी लागला होता. हांडोरेंच्या पराभवाची दखल घेत काँग्रेसने पराभवाची चौकशी केली होती. मात्र, काँग्रेसने  चौकशी अहवालावर पुढे कारवाई केली नव्हती. आता काँग्रेसने हंडोरे यांना राज्यसभा देऊन त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे.

शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. देवरा यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून देवरा यांच्या उमेदवारीची चर्चा होती. देवरा यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. त्यावेळी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी देवरा यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. त्यामुळे आता देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी मिळवून देण्यात अंबानी यांनी महत्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics : भाजपाकडून “दाग अच्छे है” मोहिम; राज्यसभेच्या उमेदवारीनंतर ठाकरे गटाचा टोला

भाजप चौथा उमेदवार देणार नाही  

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत भाजप चौथा उमेदवार देणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभा निवडणूक 100 टक्के बिनविरोध होईल. कारण सर्वांकडे आपापला मतांचा कोटा आहे. सर्वांकडे जिंकून येण्याचा कोटा असेल तर चुरस निर्माण करून महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेण्याची गरज नाही. आम्ही चौथा उमेदवार देणार नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

भाजप नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवेन! : अशोक चव्हाण

भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारी देऊन माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. ही संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. या संधीचा उपयोग मी राज्यात भाजपचे संघटन अधिक वाढविण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासाबाबत सर्वसामान्यांच्या अपेक्षा संसदेत मांडण्यासाठी करेल. यापूर्वी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासह दोन वेळा लोकसभा सदस्य म्हणून काम केले आहे. माझा आजवरचा प्रशासकीय आणि संसदीय कामकाजाचा अनुभव मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास  चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -